
PM Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत एकूण तीन टप्प्यांत केली जाते. प्रत्येक टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता कधी मिळतो, याची वाट पाहात आहेत. असे असतानाच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा 22 वा हप्ता मिळणार नाही.
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही माहिती समोर आली आहे. या योजनेला पारदर्शी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेली लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अपडेट केली जाते. या योजनेच्या अधिकृत पोर्टलनुसार काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकली आहे. शेतकऱ्यांचे नाव हटवण्याची एकूण दोन प्रमुख कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 20219 नंतर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतलेली आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे 1 फेब्रुवारी 2019 रोजीच्या अगोदर जमीन नव्हती त्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जात आहेत. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, त्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहेत.
या यादीतून नाव काढून टाकण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्या शेतकरी कुटुंबात या योजनेचा फायदा एकापेक्षा जास्त लोक घेत आहेत, त्या कुटुंबातील शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील पती-पत्नी, एक अल्पवयीन व्यक्ती तर एक प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेताना आढळल्या आहेत. त्यामुळे अशा लोकांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.
केंद्राच्या कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार काही शेतकऱ्यांच्या अर्जाबाबत, कागदपत्रांबाबत संदिग्धता आह, त्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत आता रोखण्यात आलेलीी आहे. जोपर्यंत संबंधित शेतकरी प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करत नाही, तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, यावेळी 22 व्या हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.