फक्त 4.50 लाखात मिळतेय इलेक्ट्रिक टॅक्सी, 320 किमी रेंज, 27 मिनिटांमध्ये होते चार्जिंग
फक्त 4.50 लाखांत येणार नवीन इलेक्ट्रिक टॅक्सी. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर धावते 320 किमी. 7 मिनिटांमध्ये बदलता येते बॅटरी. 27 मिनिटांमध्ये होते चार्जिंग.

देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना गुजरातमधील अहमदाबादस्थित ईव्ही स्टार्टअप कंपनी eNEG Mobility भारतीय बाजारपेठेसाठी स्वस्त आणि आधुनिक इलेक्ट्रिक टॅक्सी विकसित करत आहे. या इलेक्ट्रिक टॅक्सीची सुरुवातीची किंमत बॅटरीशिवाय केवळ 4.50 लाख रुपये असू शकते. तर बॅटरीसह या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 6.49 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही 5-सीटर मिनी SUV असेल. विशेष म्हणजे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 300 ते 320 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
eNEG Mobility च्या या इलेक्ट्रिक टॅक्सीमध्ये 30 ते 32 kWh क्षमतेचा LFP (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 67 hp पॉवर आणि 150 Nm टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. ही कार रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) सेटअप आणि सिंगल-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येऊ शकते.
कंपनीच्या नियोजनानुसार, या कारची टॉप स्पीड 80 किमी प्रतितास असेल. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 300 ते 320 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
27 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग
या इलेक्ट्रिक टॅक्सीमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही मिळू शकते. DC फास्ट चार्जरच्या मदतीने कारची बॅटरी अवघ्या 27 मिनिटांत 10 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. त्यामुळे टॅक्सी चालकांना चार्जिंगसाठी जास्त वेळ थांबण्याची गरज भासणार नाही.
7 मिनिटांत बदलता येणार बॅटरी
या कारचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान. कंपनी स्वॅपेबल बॅटरी पर्यायावर काम करत आहे. या तंत्रज्ञानामुळे डिस्चार्ज झालेली बॅटरी काढून तिच्या जागी पूर्ण चार्ज असलेली बॅटरी अवघ्या 7 मिनिटांत बसवता येऊ शकते.
याशिवाय कंपनी Battery-as-a-Service (BaaS) मॉडेलचा पर्यायही देण्याचा विचार करत आहे. या मॉडेलनुसार ग्राहक बॅटरीशिवाय कार खरेदी करू शकतील आणि बॅटरीसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन घेऊ शकतील.
फक्त 1 रुपये प्रति किलोमीटर खर्च?
कंपनीचे संस्थापक अक्षय गुप्ता यांच्या माहितीनुसार, बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेलअंतर्गत या इलेक्ट्रिक टॅक्सीचा रनिंग कॉस्ट अंदाजे 1 रुपये प्रति किलोमीटर असू शकतो. त्यामुळे व्यावसायिक टॅक्सी चालक आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी ही कार किफायतशीर ठरू शकते.
टीप : वरील माहिती उपलब्ध मीडिया रिपोर्ट्स आणि कंपनीच्या नियोजनावर आधारित आहे. कारचे फीचर्स व किंमती अंतिम लॉन्चवेळी बदलू शकतात.
