Ethanol: 1 लिटर इथेनॉलसाठी किती ऊस लागतात? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य स्थितीमुळे त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असं असताना इथेनॉल चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसात इंधनाचा तुटवडा आणि आयात कमी करण्यासाठी इथेनॉल इंधनात मिसळलं जात आहे. चला जाणून एक लिटर इथेनॉलसाठी किती ऊस लागतात ते...

अमेरिका इस्राईल आणि इराण युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि स्थिती अशीच राहिली तर पुढे कठीण परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. इथेनॉलचा वापर वाढला तर कच्चा तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी होईल असं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसात सरकार इंधनात इथेनॉलचं प्रमाण झपाट्याने वाढवत आहे. सुरूवातीला ई 10 म्हणजेच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळलं जातं होतं. त्यानंतर ई 20 आलं, म्हणजेच त्यात इथेनॉलचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलं. आता ई 30 चा विचार पुढे आला आहे. इतकंच काय तर पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स गाड्या तयार केल्या जात आहेत. नुकतीच मारूती सुझुकी वॅगन आर फ्लेक्स फ्युएल कार आली आहे. ही गाडी ई 20 ते ई 100 इथेनॉलवर चालण्यास सक्षम आहे. इतकंच काय तर हिरो स्प्लेंडर फ्लेक्स फ्युएल बाईकही बाजारात आली आहे. ही गाडी 85 टक्के इथेनॉल मिश्रणावर धावू शकते. पण तुम्हाला माहिती का? 1 लिटर इथेनॉलसाठी किती ऊस लागतो?
एक लिटर इथेनॉलसाठी किती ऊस लागतो?
ऊसाचा थेट कच्चा माल म्हणून वापर केल्यास 1 लिटर शुद्ध इथेनॉल तयार करण्यासाठी अंदाजे 12 ते 15 किलो ऊस लागेल. तर रसावर इथेनॉल तयार करायचं म्हंटलं तर 1 टन उसापासून 70 ते 84 लिटर इथेनॉल मिळू शकते. पण जेव्हा त्या रसातून साखर काढून मळीपासून इथेनॉल काढायचं झालं तर त्याचं उत्पादन कमी होते. जड मळीपासून 1 टन उसापासून फक्त 10 ते 11 लिटर इथेनॉल तयार होते.
इथेनॉलचं उत्पादन करण्याच्या पद्धती
उसाचा रस थेट इथेनॉल उत्पादनासाठी पाठवला जातो. यातून साखर तयार केली जात नाही. त्यामुळे सर्वाधिक इथेनॉलचं उत्पादन या पद्धतीतून होतं. दुसऱ्या पद्धतीत साखर काढली जाते आणि उरलेल्या घट्ट पाकाचं इथेनॉल तयार केलं जातं. तिसऱ्या पद्धतीत उरलेल्या मळीपासून इथेनॉल तयार केलं जातं. पण इथेनॉल कसं तयार करायचं हे सरकारी धोरण, बाजारातील मागणी आणि साखर उत्पादनाच्या लक्ष्य यावर अवलंबून आहे.
इथेनॉल बनवण्याची प्रक्रिया
ऊस कारखान्यात आणल्यानंतर क्रशरमध्ये टाकून त्यातून रस काढला जातो. जेव्हा मळीपासून इथेनॉल करायचं असतं तेव्हा त्यातून साखर वेगळी केली जाते. तर उरलेल्या घट्ट पाकापासून इथेनॉल उत्पादनाची प्रक्रिया केली जाते. उसाचा रस मोठ्या आंबवण्याच्या टाक्यांमध्ये ठेवला जातो. यात यीस्टचं विशेष मिश्रण टाकलं जातं. त्यामुळे नैसर्गिक साखरेचं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइटमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. या जैविक प्रक्रियेतून वॉश नावाचा एक द्रव तयार होतो. त्यात साधारण 8 ते 10 टक्के अल्कोहोल असतं. हा आंबवलेला द्रव उर्ध्वपातन संयंत्रात टाकलं जातं. मिश्रण गरम केलं जातं. पाण्याआधी अल्कोहोलचं बाष्पीभवन होतं. त्यातून अल्कोहोलची वाफ वेगळी केली जाते. ती थंड करून द्रवरूपात रुपांतरीत केली जाते यात 95 टक्के शुद्ध इथेनॉल असतं.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्यासाठी ते 99.8 टक्क्यांपेक्षा अधिक शुद्ध असणं आवश्यक आहे. त्यामुळे तसं करण्यासाठी मॉलिक्युलर सीव्ह सारख्या प्रगत निर्जलीकरण तंत्राचा वापर केला जातो. या तंत्रामुळे इथेनॉलमधील उरलं पाणी काढलं जातं. त्यानंतर हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित केलं जातं.