देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट… HR88B8888 क्रमांकाच्या नंबर प्लेटची विक्री इतक्या कोटीला; आकडा ऐकूनच घेरी येईल
माणसाला हटके व्हीआयपी नंबर प्लेट्सची हौस असते. नुकतीच HR88B8888 ही नंबर प्लेट हरियाणात १.१७ कोटी रुपयांना विकली जाऊन देशातील सर्वात महागडी ठरली. ५० हजारांच्या बोलीने सुरुवात होऊन ती कोटींचा आकडा ओलांडली. केरळमध्येही यापूर्वी ४५.९९ लाखांना व्हीआयपी नंबर विकला गेला होता. ही खरेदी व्यक्तींच्या आवडीनिवडी आणि प्रतिष्ठेचा भाग बनली आहे.

माणूस हा हौशी असतो. त्याच्या हौसेला मोलही नसते. आली लहर केला कहर अशी माणसाची अवस्था असते. त्यामुळेच या हटकेपणाच्या वेडापायी तो काय करेल हे सांगता येत नाही. बरं प्रत्येकाचे शौक एक असती तर शप्पथ. सतरा जणांचे सतरा शौक. काहींना जुन्या वस्तू गोळ्या करण्याचा शौक, कुणाला जुन्या नोटा जमवण्याचा छंद तर कुणाला जुन्या गाड्या मिळवण्याचा नाद. प्रत्येकाचा नादच खुळा. काहींना तर वाहनांचे हटके आणि व्हीव्हीआयपी नंबर मिळवण्याची हौस असते. एका व्यक्तीलाही हा शौक जडला आणि देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट त्याने खरेदी केली. त्याची किमत काही कोटीत होती. हा आकडा ऐकल्यावर तुम्हालाही घेरी आल्याशिवाय राहणार नाही.
HR88B8888 हा नंबर आता देशातील सर्वात महागडा कार रजिस्ट्रेशन नंबर बनला आहे. बुधवारी हरियाणात हा नंबर 1.17 कोटी रुपयाला विकला गेला. या आठवड्यातील नंबराच्या लिलावात HR88B8888 या नंबरसाठी 45 अर्ज आले होते. 50 हजारावरून बोलीला सुरुवात झाली. प्रत्येक मिनिटाला ही बोली वाढत गेली आणि संध्याकाळी 5 वाजता 1.17 कोटी ही फायनल बोली लागली आणि ही नंबर प्लेट 1.17 कोटीत विकली गेली. विशेष म्हणजे दुपारी 12 वाजता या नंबरसाठी 88 लाखाची बोली लागली होती. गेल्याच आठवड्यात ‘एचआर22डब्लू2222’ या नंबरसाठी 37.91 लाख रुपयांची बोली लागली होती.
HR88B8888 चा अर्थ काय?
HR88B8888 हा एक गाडीचा खास नंबर आहे. त्याला व्हीआयपी नंबरही म्हटलं जातं. या नंबरला बोली लावून प्रीमियमवर खरेदी केलं जातं.
HR राज्य कोड आहे. यावरून ही कार हरियाणात रजिस्टर झाल्याचं स्पष्ट होतं.
हरियाणाच्या ज्या क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO) वा जिल्ह्यात वाहन रजिस्टर झालीय त्याचा क्रमांक 88 आहे.
B चा वापर विशिष्ट RTO च्या अंतर्गत विकल सीरीज कोड दाखवण्यासाठी होतो.
8888 ही गाडीला देण्यात आलेली नोंदणीकृत चार अंकी संख्या आहे.
या नंबर प्लेटची खासियत अशी आहे की ती आठच्या मालिकेसारखी दिसते, कारण मोठ्या अक्षरातील ‘B’ हे आठसारखे दिसते आणि त्यात फक्त एकाच अंकाची पुनरावृत्ती केलेली आहे.
आठवड्याला लिलाव
हरियाणात व्हीआयपी फॅन्सी नंबर प्लेटचा दर आठवड्याला लिलाव होतो. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान हा लिलाव होतो. लिलावात भाग घेणारे आपल्या पसंतीच्या नंबरासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निकाल घोषित केला जाईपर्यंत बोली लावण्याचा खेळ खेळला जातो. हा लिलाव अधिकृतपणे fancy.parivahan.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन होते.
या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये केरळचे उद्योगपती वेणू गोपालकृष्णन यांनी लेम्बोर्गिनी उरुस परफॉर्मेटसाठी 45.99 लाखाची बोली लावली होती. KL 07 DG 0007 या व्हीआयपी नंबरसाठी त्यांनी ही बोली लावली होती. या नंबर प्लेटसाठी 25 हजारापासून बोलीला सुरुवात झाली होती. ती नंतर वाढून रेकॉर्ड नंबरवर गेली होती. ‘0007’ हा नंबर आयकॉनिक जेम्स बाँड कोडची आठवण करून देतो.
