कारनंतर आता ‘या’ दुचाकी कंपन्यांनी वाहनांची फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

| Updated on: May 28, 2021 | 3:47 PM

दुचाकी कंपन्यांनी कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता वॉरंटी व सेवा योजनेचा (सर्व्हिस स्कीम) विस्तार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कारनंतर आता या दुचाकी कंपन्यांनी वाहनांची फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
Hero Motocorp
Follow us on

मुंबई : कोरोना साथीचा रोग (Coronavirus) आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर बहुतांश कार कंपन्यांनी घोषणा केली आहे की, ते आपल्या ग्राहकांसाठी वाहनांच्या सेवा आणि हमीची (सर्व्हिस आणि वॉरंटी) कालावधी वाढवित आहेत. अशा परिस्थितीत दुचाकी कंपन्यांचादेखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. काही दुचाकी कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या वाहनांची सर्व्हिस आणि वॉरंटीचा कालावधी वाढवला आहे. यामध्ये केटीएम (KTM), बजाज ऑटो (Bajaj Auto)) आणि हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) या कंपन्यांचा समावेश आहे. (KTM and Bajaj Auto extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

या दुचाकी कंपन्यांनी कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता वॉरंटी व सेवा योजनेचा (सर्व्हिस स्कीम) विस्तार करणार असल्याचे जाहीर केले आहे. केटीएमने आपली वॉरंटी आणि सर्व्हिस 31 जुलै 2021 पर्यंत वाढवली आहे. ही ऑफर केवळ अशा ग्राहकांसाठी उपलब्ध असेल ज्यांच्या वाहनांची वॉरंटी आणि विनामूल्य सर्व्हिस 21 मे 2021 पर्यंत वैध आहे.

बजाज ऑटोबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने अशा ग्राहकांसाठी विनामूल्य सेवा वाढवली आहे ज्यांची सर्व्हिस आणि वॉरंटी एप्रिल आणि मे महिन्यात संपत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने त्यांची सर्व्हिस आणि वॉरंटी 31 जुलै 2021 पर्यंत वाढवली आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहकांना किती अडचणी येत आहेत, हे त्यांना माहिती आहे, असे बजाजने म्हटलं आहे.

Hero MotoCorp च्या ग्राहकांसाठी खुशखबर!

देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची (मोटारसायकल आणि स्कूटर) वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (CoronaVirus Second Wave) थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या वाहनांची वॉरंटी आणि नि:शुल्क सेवांचा कालावधी 60 दिवसांनी वाढवला आहे.

हिरो मोटोकॉर्प कंपनीने गेल्या आठवड्यात जाहीर केले की, आपल्या सर्व विद्यमान ग्राहकांच्या हितासाठी, सध्याच्या काळात वाया जाणाऱ्या सेवांच्या कालावधीत 60 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, या सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी घाईत डीलरकडे धाव घेऊ नये, यासाठी हा कालावधी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, हिरो मोटोकॉर्पने सोमवारी हरियाणामधील गुरुग्राम आणि धारुहेरा तसेच उत्तराखंडमधील हरिद्वार येथील तीन प्लांटमध्ये अंशतः कामकाज सुरू केले आहे.

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

इतर बातम्या

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

Hero MotoCorp 2022 मध्ये इलेक्ट्रिक बाईक/स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या कंपनीचं प्लॅनिंग

(KTM and Bajaj Auto extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)