तुमच्या खिशापासून ते शिक्षण आणि आरोग्यापर्यंत, 2020 च्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

मागील वर्षी आयकर, शिक्षण, आरोग्यापासून बँकांमध्ये जमा होणाऱ्या पैशांपर्यंत मोठ्या घोषणा झाल्या होत्या. त्यापैकी 10 मोठ्या घोषणा...

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:03 AM, 28 Jan 2021
तुमच्या खिशापासून ते शिक्षण आणि आरोग्यापर्यंत, 2020 च्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली : अर्थ मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी आगामी वर्ष 2021-22 साठी देशाचा अर्थसंकल्प मांडतील. मात्र, त्याआधी त्यांनी मागीलवर्षी नेमक्या काय घोषणा केल्या होत्या याचाही मागोवा घेणं गरजेचं आहे. त्यातूनच यंदा त्या काय घोषणा करु शकतात याचा अंदाज येणार आहे. यावेळी त्यांच्याकडून कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कंबरडं मोडलेल्या सामान्य नागरिकांनाही खूश करण्याचा प्रयत्न होईल. मागील वर्षी आयकर, शिक्षण, आरोग्यापासून बँकांमध्ये जमा होणाऱ्या पैशांपर्यंत मोठ्या घोषणा झाल्या होत्या. त्यापैकी 10 मोठ्या घोषणा… (Important 10 announcement from Central Budget 2020-21 India)

1. या अर्थसंकल्पात दोन टॅक्स घोषित करण्यात आले. यातील एक जुन्या कररचनेप्रमाणे होता, तर दुसरा नव्या कराप्रमाणे होता. तसेच नागरिकांना यापैकी हवा तो निवडण्याचा पर्याय दिला होता. मात्र, एकावेळी एकाच कर प्रणालीचा उपयोग करता येणार होता. दोन्ही कर रचनेत 5 लाख रुपयांपर्यंचं उत्पन्न करातून मुक्त होतं. याशिवाय 5 ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 7.5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 10-12.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 12.5 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25 टक्के कर घोषित केला होता.

2. 2020 च्या संरक्षण अर्थसंकल्पात 6 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे हा अर्थसंकल्प 3.37 लाख कोटी रुपयांचा झाला होता. 2019 पर्यंत ही रक्कम 3.18 लाख कोटी रुपये होती. यात संरक्षण विभागातील पेन्शनची रक्कम जोडली तर हा आकडा 4.7 लाख कोटी होतो. शस्त्रास्त्र खरेदीसाठी आणि आधुनिकीकरणासाठी 1,10,734 कोटी रुपये देण्यात आले होते.

3. शिक्षणासाठी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात 99,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 3,000 कोटी रुपये कौशल्य विकासासाठी देण्यात आले होते. यावेळी सीतारमन यांनी मार्च 2021 पर्यंत 150 उच्च शिक्षण संस्था सुरु होतील अशीही घोषणा केली होती. याशिवाय नॅशनल पोलीस यूनिव्हर्सिटी आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचीही घोषणा केली होती. तसेच डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालयाचीही घोषणा करण्यात आली होती.

4. आरोग्यासाठी 69 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यात पीएम जन आरोग्य योजनेच्या 6,400 कोटी रुपयांचाही समावेश होता. पीएम जन आरोग्य योजनेंतर्गत 20 हजारपेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये उपचाराच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. 2020-21 साठी स्वच्छ भारत अभियानासाठी 12,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. घरघरात पाणी पोहचावं म्हणून जल जीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

5. पायाभूत सुविधांसाठी 5 वर्षात 100 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं आश्वासन देण्यात आलं होतं. यात रस्त्यांसाठी 1.7 लाख कोटी रुपयांची तरतूद होती.

6. रेल्वेसाठी 70,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. तसेच एकूण 1.61 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

7. शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी 2.83 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. 15 लाख कोटी रुपयांपर्यंतचं शेती कर्ज देण्याचीही घोषणा करण्यात आली. 20 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप आणि 100 दुष्काळमुक्त जिल्हे करण्याचीही घोषणा करण्यात आली होती.

8. उद्योगपतींसाठी या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली होती. यानुसार डिविडेंड डिस्ट्रिब्यूशन टॅ्क्स (DDT) बंद करण्यात आला होता. यामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 25,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण पडला होता.

9. पर्यटनाला चालना देण्यासाठी 2020-21 या आर्थिक वर्षात 2,500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

10. केंद्र सरकारने गावा-गावात ब्रॉडबँड पोहचवण्याच्या भारत नेट (भारत ब्रॉडबँक नेटवर्क लिमिटेड) योजनेची सुरुवात केली होती. त्यासाठी मागील वर्षी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा :

फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

व्हिडीओ पाहा :