Special Story : फक्त 12 वी पर्यंत शिक्षण… 711 कोटीचा अख्खा टॉवरच केला खरेदी, कोण आहेत दिनेश ठक्कर?
एंजल वनचे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी फक्त 12 वीपर्यंत शिक्षण घेऊनही 711 कोटींचा जुहू टॉवर खरेदी केला आहे. एका कपडा व्यापाऱ्याच्या घरातून शेअर बाजारात उतरत त्यांनी एंजल ब्रोकिंगची स्थापना केली, जी आता एंजल वन म्हणून ओळखली जाते.

मुंबईतील मुलुंडमधील एका कपडा व्यापाऱ्याच्या घरात जन्म, केवळ इयत्ता 12 वीपर्यंतच शिक्षण… कोणतीही मोठी डिग्री नाही, तरीही त्याने वडिलांचा व्यवसाय जिद्दीने वाढवला. 1990मध्ये शेअर मार्केट ब्रोकरेजमध्ये पाऊल ठेवलं आणि अवघ्या सहा वर्षातच फिनटेक कंपनी एंजेल ब्रोकिंगची स्थापना केली. हा दैदिप्यमान प्रवास आहे Angel Oneचे संस्थापक दिनेश ठक्कर यांचा. आयुष्याचा एक मोठा काळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या दिनेश ठक्कर यांनी एक फ्लॅट नव्हे अख्खा टॉवरच खरेदी केला आहे. त्यांनी जुहू येथे 711 कोटी रुपयांचा टॉवर खरेदी केला असून मुंबईतील ही सर्वात मोठी डील आहे.
एंजेल वनचे संस्थापक, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश ठक्कर यांनी मुंबईच्या जुहू येथे 711 कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी करण्याचा करार केला आहे. ठक्कर यांनी या ठिकाणी एक दोन फ्लॅट नव्हे, तर संपूर्ण रेसिडेन्शिअल टॉवरच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील ही रेजिडेन्शियल यूनिटची सर्वात मोठी डील आहे.
रिअल इस्टेट कंपनी एम्बेसी डेव्हल्पमेंट्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने दिनेश ठक्कर यांच्यासोबत एक एमओयू केला आहे. त्यानुसार जूहूमध्ये Embassy Terrazza प्रकल्पातील एक संपूर्ण टॉवरच ठक्कर यांना विकला जाणार आहे. 711 कोटी रुपयांमध्ये ठक्कर यांनी हा टॉवर खरेदी केला. त्यात एवढं असं काय आहे? असं तुम्हाला वाटत असेल. तुमच्या मनात हे कुतुहूल निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
63,000 वर्ग फूटाचा टॉवर
हा टॉवर ग्राऊंड प्लस सात मजली आहे. यात सुमारे 63,000 वर्ग फुटाचा कारपेट एरिया आहे. या हिशोबाने या प्रॉपर्टीची किमत सुमारे 1.13 लाख रुपये प्रति वर्ग फूट होते.
Embassy Terrazza जुहू तारा रोडवरील अल्ट्रा-लग्जरी रेजिडेंशियल प्रोजेक्ट आहे. हा जुहूतील सर्वात महागडा प्रकल्प आहे.
एका मजल्यावर एकच फ्लॅट
दोन एकराहून अधिक जागेवर हा प्रकल्प उभा आहे. या टॉवरमध्ये एकूण 50 फ्लॅट बनवण्याची योजना आहे. कंपनीच्या मते, या प्रकल्पाची अंदाजित ग्रॉस डेव्हल्पमेंट व्हॅल्यू म्हणजे GDV 3,000 कोटी रुपयाहून अधिक आहे. या ठिकाणी पाच टॉवर बांधण्यात येणार आहे. प्रत्येक टॉवरच्या एका मजल्यावर केवळ एकच फ्लॅट असणार आहे. या मोठ्या आकाराच्या घरात इनडोअर गार्डन, वेलनेस तसेच लाइफस्टाइलच्या सुविधा असणार आहेत. तसेच फ्लॅटमधून समुद्राचा व्ह्यू दिसणार आहे.
कोण आहेत दिनेश ठक्कर?
दिग्गज फिनटेक कंपनी एंजेल वनचे संस्थापक, चेअरमन आणि प्रबंध संचालक दिनेश ठक्कर यांना उद्योग जगतात डीटी (DT) या नावानेही ओळखलं जातं. कोणतीही मोठी डिग्री हाताशी नाही. फक्त इयत्ता 12 वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. देशातील सर्वात मोठा डीजिटल स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्स उभा करण्यासाठी त्यांना कार्पोरेट जगतातील आदर्श उद्योजक मानलं जातं.
मुलुंडच्या कपडा व्यापाऱ्याच्या घरात दिनेश यांचं जन्म झाला. ठाण्याच्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. मुंबईच्या किशिनचंद चेलाराम म्हणजे केसी कॉलेजमधून त्यांनी 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी शिक्षणाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी एका मुलाखतीत शिक्षण सोडणं ही आयुष्यातील सर्वात मोठी जोखिम असल्यांच म्हटलंय. कोणत्याही डिग्रीशिवाय मी आपला व्यवसाय उभा करू शकतो याचा मला विश्वास होता, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी तसं करूनही दाखवलं.
दिनेश ठक्कर यांनी 1996मध्ये एंजेल ब्रोकिंगची स्थापना केली. त्यांना देशाच्या ब्रोकिंग सेक्टरमध्ये डिजिटल क्रांतीचे जनक मानलं जातं. टेक्नॉलॉजीच्या ताकदीची वेळीच जाणीव असणारे ते एकमेव उद्योजक होते. 2019मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचा पूर्णपणे ‘डीजिटल फर्स्ट’ फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये बदल केला. त्यानंतर या कंपनीचं नाव एंजेल वन ठेवलं. आज एंजेल वन 27 हजार कोटी मार्केट कॅप असलेली कंपनी बनलेली आहे.
