मोठी अपडेट! EPFO 3.0 लवकरच सेवेत, पीएफविषयीचे हे 5 नियम बदलणार
EPFO 3.0 Update : EPFO 3.0 हे जून 2025 मध्ये लाँच होणार आहे. त्याचा थेट फायदा देशभरातील 9 कोटी कर्मचाऱ्यांना होईल. EPFO 3.0 च्या स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे आता विनाविलंब अनेक सुविधा मिळतील. बँकेप्रमाणे एटीएम आणि अन्य सुविधा मिळतील.

केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच त्यांचा नवीन प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लाँच करणार आहे. EPFO 3.0 हा एक जोरदार IT प्लेटफॉर्म असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बँकेसारख्या सेवा सहज उपलब्ध होतील. ही सेवा जून 2025 मध्ये लागू होईल, अशी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी गेल्या महिन्यात माहिती दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता अडचणीच्या वेळी पीएफसाठी महिना महिना थांबण्याची गरज राहणार नाही. त्यांना त्यांच्या गरजेनुसार विहित नियमानुसार पीएफची रक्कम काढता येईल. त्यांना या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही.
ATM मधून काढा EPF चा पैसा
केंद्र सरकारनुसार, EPFO 3.0 एक विश्वासहर्य प्लेटफॉर्म असेल. भारतातील 9 कोटींहून अधिक ग्राहकांना विना कोणत्या कटकटीशिवाय सहज सोप्या पद्धतीने नवीन सुविधा देण्यात येतील. यामध्ये ग्राहकांचे दावे स्वयंचलित पद्धतीने हातावेगळे होतील. त्यांना थेट ATM मधून रक्कम काढता येईल. त्यांना बँक खात्यानुसार, ATM मधून EPF चा पैसा काढता येईल.
EPFO 3.0 मध्ये काय काय बदल होणार :
1. PF काढण्याची प्रक्रिया सहज सोपी आणि गतिमान होईल. तुमच्या दाव्याचा निपटारा लागलीच होणार. आता मानवी हस्तक्षेप कमी होईल.
2. ATM ने रक्कम काढता येईल. दावा मंजूर झाल्यावर तुम्हाला बँक खात्याप्रमाणे ATM मधून पैसे काढता येईल.
3. नवीन डिजिटल अपडेटमुळे तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन तुमच्या खात्याची योग्य माहिती मिळेलच. पण आता प्रत्येकवेळी अर्ज करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही नियमाप्रमाणे पैसे काढू शकाल.
4. सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. EPFO आता अटल पेन्शन योजना आणि पंतप्रधान जीवन विमायोजना सारख्या इतर सामाजिक सुरक्षा योजनांची सेवा-सुविधा देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि सुरक्षेचा लाभ मिळेल.
5. OTP आधारित पडताळा प्रक्रियेमुळे कर्मचार्यांना दरवेळी किचकट प्रक्रियेतून जावे लागणार नाही. त्यांना लांबलचक अर्ज करावा लागणार नाही. ओटीपीच्या माध्यमातून गतिमान आणि सुरक्षित बदल करता येईल.
ESIC आरोग्य योजना
कर्मचारी राज्य विमा मंडळ (ESIC) पण त्यांच्या सेवा अद्ययावत करत आहे. लवकरच ईएसआयसी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेतंर्गत सरकारी, खासगी आणि धर्मार्थ दवाखान्यात, रुग्णालयात मोफत उपचारांचा लाभ घेता येईल. सध्या कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या 165 रुग्णालयाच्या माध्यमातून 18 कोटी लोकांना उपचाराचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात ईएसईसी रुग्णालयाची अवस्था काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
