Donkey Milk: गाढविणीचे दूध 7,000 रुपये लिटर; काय आहे असे यामध्ये खास?
Donkey Milk Costs: जगभरात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे. या एक लिटर दुधाची किंमत 5000 ते 7000 रुपयांपर्यंत आहे. अनेक शहरात या दुधाची मागणी वाढली आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या आयटी हबमध्ये त्याची मोठी किंमत आहे.

आज 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून ओळखल्या जातो. सामान्य पणे गाय अथवा म्हशीचे दूध पिल्या जाते. तर काही भागात बकरी, मेंढी, तिथला पारंपारिक प्राणी याचे दूध पिल्या जाते. पण सध्या गाढविणीच्या दूधाला मोठे महत्त्व आले आहे. कारण या दुधाचा भाव 7000 रुपयांपर्यंत जातो. गाढवाचा (Donkey Milk Costs) वापर तसा ओझे वाहण्यासाठी करण्यात येतो. पण अनेक शहरात या दुधाची मागणी वाढली आहे. बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या आयटी हबमध्ये त्याची मोठी किंमत आहे. काय आहे या दुधात असे खास?
गाढविणीच्या दुधाचा मोठा व्यवसाय
जगभरात गाढविणीच्या दुधाची मोठी मागणी आहे. याच्या एक लिटर दुधाची किंमत जवळपास 5000 ते 7000 रुपयादरम्यान आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात गाढविणीच्या दुधाची मागणी वाढत आहे. हे दूध थेट घरोघरी जाऊन विक्री करण्यावर काही जण भर देतात. तर या दुधावर प्रक्रिया करून त्याचा सौंदर्य प्रसाधनांसह इतर अनेक गोष्टीसाठी वापर करण्यात येतो. माध्यमातील काही वृत्तानुसार, गाढविणीचे दुधाच्या पनीरची किंमत 65,000 रुपये प्रति किलोच्या घरात आहे. तर या दुधाची पावडर 1 लाख रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होत असल्याचे सांगितले जाते.
कुठे होतो या दुधाचा वापर?
या दुधाचा वापर हा जास्त करून सौंदर्य प्रसाधनं तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये करण्यात येतो. याशिवाय गाढविणीच्या दुधाचे इतरही अनेक फायदे आहेत. यामध्ये प्रोटीन, अँटी-मायक्रोबियल गुण असतात. हा दूध पोटात चांगल्या जीवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त मानल्या जाते. या दुधामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. पोट गुबारणे, गॅस, अपचन आणि इतर पोट विकारांवर ते गुणकारी मानल्या जाते. ग्रामीण भागात लहान मुलांसाठी एक चमचा दूध पाजण्याची प्रथा आहे. ज्या लोकांना गाय अथवा म्हशीच्या दुधामुळे त्रास होतो त्यांच्यासाठी गाढविणीचे दूध हे गुणकारी ठरू शकते. गाढविणीच्या दुधातील पोषक तत्वामुळे रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते, रक्त संचार सुधारतो तसेच इतर समस्या दूर होतात.
