PF UPI: मोठी आनंदवार्ता! फॉर्म भरण्याची कटकट संपली, UPI द्वारे काढा पीएफ, या महिन्यापासून सुविधा
PF Withdrawal with UPI: एटीएमद्वारे पीएफ काढण्याची घोषणा होऊन सहा महिने उलटले. पण अद्याप ही सुविधा ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. मात्र युपीआय द्वारे पैसे काढण्याची सुविधा लागलीच मिळणार आहे. देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना ही आनंदवार्ता मिळाली आहे.

PF Withdrawal with UPI: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने(EPFO) जवळपास 8 कोटी सदस्यांना नवीन वर्षांची भेट दिली आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी त्यांना अर्जफाटे करण्याची, ऑनलाईन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. त्यांना पीएफ कार्यालयाचे उंबरठेही झिजवावे लागणार नाही. तर क्लिष्ट अर्ज भरल्यानंतर दहा-पंधरा दिवस पैसे येण्याची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना ताटकाळत अथवा तिष्ठत राहावं लागणार नाही. त्यांना आता युपीआय द्वारे झटपट पैसे काढता येतील. ही सुविधा अगधी कमी कालावधीत सुरू होणार आहे.भीम युपीआय ॲपच्या (BHIM UPI App) माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एप्रिलपासून युपीआय सुविधा
येत्या एप्रिल महिन्यापासून युपीआयद्वारे सदस्य त्यांचा पीएफ काढू शकतील. BHIM ॲपवर EPFO सदस्यांनी ही रक्कम काढता येईल. कर्मचारी थेट त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील. ही रक्कम अवघ्या काही मिनिटात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. RBI च्या नियमानुसार आणि UPI व्यवहार मर्यादेनुसार ही रक्कम काढता येणार आहे. त्यानुसारच त्वरीत रक्कम काढण्यासाठी एक मर्यादा ठेवण्यात आली आहे. पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. तितकीच रक्कम पीएफ खात्यातून काढता येईल. संपूर्ण रक्कम काढता येणार नाही.
काय आहे ही सुविधा
यापूर्वी ऑटो सेटलमेंट प्रक्रियेतून केवळ एक लाख रुपये काढण्याची तरतूद होती. ती वाढवून आता पाच लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजे सदस्यांना आता युपीआयच्या माध्यमातून थेट पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार आहे. आजारपण, शिक्षण, लग्न अथवा घर खरेदीसाठी वा इतर तातडीच्या खर्चासाठी ही रक्कम काढता येणार आहे. नव्या प्रणालीत कर्मचारी आपल्या युपीआय पिनचा वापर करून सुरक्षितपणे ही रक्कम काढू शकतील. ईपीएफओ त्यासाठीच्या तांत्रिक गोष्टीची लवकरच पूर्तता करणार आहे. त्यासाठी खास सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.
या नवीन प्रक्रियेसाठी EPFO ने NPCI सोबत करार केला आहे. BHIM ॲपच्या मदतीने EPFO सदस्य आरोग्य, शिक्षण, लग्न वा इतर खास कारणांसाठी पीएफची रक्कम काढू शकतील. याविषयीचा क्लेम त्यांना करता येईल. ईपीएफओ सदस्यांनी क्लेम केल्यावर लागलीच यंत्रणा खात्यातील रक्कमेची पडताळणी करेल आणि सदस्यांच्या विनंतीनुसार ही रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात झटपट जमा होईल. अडचणीच्या काळात ही रक्कम मोठी मदत ठरेल.
