Explainer: सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीला ‘हा’ ठरतोय उत्तम पर्याय; तज्ज्ञांनी सांगितले फायदे
सध्याच्या काळात सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. सहसा सोन्याचांदीच्या नाणी, बार किंवा बिस्किटं यांमध्ये गुंतवणूक केली जाते. परंतु डिजिटल सोनं किंवा चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक हा एक चांगला पर्याय ठरतोय.

सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीचे पर्याय : सोने आणि चांदीच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. असं असलं तरी त्याती गुंतवणूक मात्र कमी झालेली नाही. उलट सोने-चांदीमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सहसा सोने-चांदीचे दागिने, नाणी, बार/बिस्किटं यांमध्ये गुंतवणूक केली जाते. परंतु या पारंपरिक पर्यायांशिवाय सोने आणि चांदीचं ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हा एक चांगला पर्याय असल्याचं गुंतवणुकीतील तज्ज्ञ म्हणत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोनं आणि चांदीचे ईटीएफ (ETF) अत्यंत कमी पैशातही खरेदी करता येतं, ते राखण्यातही कोणता त्रास होत नाही, शिवाय अगदी कमी व्यवहार शुल्कासह सहज विक्रीचीदेखील सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे जर तुम्हाला सोनं-चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर नाणी आणि दागिन्यांपेक्षा ईटीएफ चांगला पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
दागिन्यांचे मेकिंग चार्जेस (घडनावळीचा खर्च)
सोनेचांदीचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस (घडनावळ खर्च) म्हणून मोठी रक्कम ग्राहकांना खर्च करावी लागते. यामुळे दागिन्यांची किंमत आणखी वाढते. दागिने विकताना मात्र मेकिंग चार्जेससाठी खर्च केलेला एक रुपयाही परत मिळत नाही. त्यामुळे गुंतवणुकीसाठी दागिन्यांचा पर्याय फारसा फायदेशीर नाही. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 82 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 175 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) 1 जानेवारी रोजी सोनं 76,772 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. हाच दर 26 डिसेंबर रोजी 1,39,890 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. त्याचवेळी 1 जानेवारी रोजी चांदीची किंमत 87,300 रुपये प्रतिकिलो होती, जी 26 डिसेंबर रोजी 2,40,300 रुपये प्रतिकिलो होती.
खरेदी कशावर आधारित असावी?
गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबद्दल ‘इंडिया टीव्ही’ बोलताना मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (कमॉडिटीज) राहुल कलंत्री म्हणाले, “मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी सोनं आणि चांदीचं ईटीएफ हा एक चांगला पर्याय आहे. जेव्हा सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार येतो, तेव्हा तुम्ही ते कोणत्या स्वरुपात ठेवता हे महत्त्वाचं नसतं. ते मुळात तुमच्या ज्ञानावर आणि खरेदीच्या सर्वांत सोयीस्कर माध्यमांवर अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्तीची निवड त्याच्या वैयक्तिक गरजांवर, ध्येयांवर आधारित बदलते.”
EFT – आतापर्यंतचा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय
“सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये सोनं/चांदी ईटीएफ हा आतापर्यंतचा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या कमी मूल्याच्या युनिट्स, देखभाल खर्चाचा अभाव, अंतर्निहित ईटीएफद्वारे दिलेली शुद्धतेची हमी आणि कमी व्यवहार खर्च यांसारख्या फायद्यांमुळे हे शक्य झालं आहे”, असं आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर्सचे संचालक (कमॉडिटी आणि चलन) नवीन माथूर म्हणाले. सोने-चांदीचे ईटीएफ हे गुंतवणूक निधी आहेत, जे स्टॉक एक्सचेंजवर शेअर्ससारखे व्यापार करतात. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी न करता मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करता येते.
म्युच्युअल फंडद्वारेही सोनं-चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक
म्युच्युअल फंडांद्वारेही सोनं-चांदीच्या ईठीएफमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्ष दागिने, नाणी किंवा बिस्किटं खरेदी करून, ईटीएफ, फ्युचर्स आणि ऑप्शन्स किंवा म्युच्युअल फंड यांद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते. या प्रत्येक पर्यायाचे स्वतंत्र फायदे आणि तोटे असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या ध्येयानुसार, उद्देशांनुसार कशात गुंतवणूक करावी, याचा विचार करावा असं तज्ज्ञ सांगतात. जर तुम्हाला सोनं-चांदी प्रत्यक्षात खरेदी करायचं असेल किंवा तुम्ही त्याला अधिक महत्त्व देत असाल तर नाणी किंवा बिस्किटं हा अधिक चांगला पर्याय असू शकतो, असं मत कलंत्री यांनी नोंदवलंय. दागिन्यांपेक्षा सोन्याचांदीची नाणं किंवा बिस्किट खरेदी केली तर अधिक फायदा होऊ शकतो.
ETF विकणं तुलनेनं सोपं कसं?
याविषयी कलंत्री पुढे म्हणाले, प्रत्यक्षात आपण जेव्हा सोन्याचांदीच्या वस्तू, दागिने खरेदी करतो, तेव्हा आपण त्याचे थेट मालक बनतो. परंतु त्यात देखभाल, विमा खर्च आणि कमी लिक्विडिटी यांसारख्या समस्या येतात. सोन्याची लिक्विडिटी म्हणजे एक अशी मालमत्ता आहे जी त्याचं मूल्य न गमावता जलद आणि सहजपणे रोख रकमेत रूपांतरित केली जाऊ शकते. तर फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगद्वारे गुंतवणुकीबद्दल कलंत्री म्हणाले, “हा पर्याय अशा लोकांसाठी योग्य आहे, जे अनुभवी गुंतवणूकदार असतील, जे इमर्जन्सी संधीच्या शोधात असतील किंवा रिस्क क मी करण्यासाठी ‘हेजिंग’ करु इच्छित असतील. परंतु ते खूप धोकादायक आहेत.” डिजिटल सोन्याबद्दल त्यांनी सांगितलं, “डिजिटल सोनं हे मुख्य म्हणजे त्याच्या सोयी, कमी गुंतवणुकीची रक्कम आणि खरेदी-विक्रीच्या सुलभतेमुळे लोकप्रिय होत आहे.”
थर्ड-पार्टी वॉल्ट मॅनेजरतर्फे डिजिटल गोल्डचं व्यवस्थापन
“डिजिटल सोनं हे सेबी-नियमित उत्पादन नाहीत. त्यामुळे ते खाजगी प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलं जातं. तिथे सोनं थर्ड-पार्टी वॉल्ट मॅनेजरकडे असतं. यामध्ये संबंधित जोखीमसुद्धा असतात. या जोखीम लक्षात घेता, आम्ही गुंतवणुकदारांना फक्त सेबी-नियमित उत्पादनांद्वारेच सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
ईटीएफ कसं काम करतं?
ईटीएफ अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून बाँड, स्टॉक किंवा इतर संपत्तींच्या एका सेटमध्ये गुंतवणूक करतो, ज्याला त्याचा पोर्टफोलियो म्हटलं जातं. बहुतांश ईटीएफ एखाद्या विशिष्ट इंडेक्सला (जसं की निफ्टी 50) ट्रॅक करतं. म्हणजेच ते त्या इंटेक्सच्या प्रदर्शनाची नक्कल करतात. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातून शेअर बाजार सुरू असताना ईटीएफ खरेदी किंवा विकू शकता. ज्या प्रकारे तुम्ही एखादं शेअर खरेदी करता किंवा विकता, अगदी त्याच प्रकारे तुम्ही ईटीएफ खरेदी किंवा विक्री करू शकता.
