Gold And Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठा बदल, दिवाळीपर्यंत अजून घेणार झेप? आताची किंमत काय?
Gold And Silver Rate Today : GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने आणि चांदीचा स्वींग मूड दिसून आला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला चार दिवस दोन्ही धातुंनी मोठी मुसंडी मारली होती. आता या धातुची काय आहेत किंमत?

सध्या सणासुदीची धामधूम आहे. आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. तर नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सणासुदीपूर्वीच सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसातच सोने चमकले. तर चांदीला लकाकी आली होती. त्यानंतर लागलीच GST परीषदेच्या बैठकीत मोठा निर्णय झाला. अनेक वस्तू स्वस्त तर शौक महागले. सराफा बाजारातही उलटफेर दिसून आला. काय आहेत आता सोने आणि चांदीची किंमत?
सोन्याची मुसंडी
आठवड्याच्या सुरुवातीचे चार दिवस सोन्याला उधाण आले होते. तर 4 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर त्यादिवशी सोने स्वस्त झाले. तर 5 सप्टेंबर रोजी सोन्याने 760 रुपयांची मुसंडी मारली होती. मागील चार दिवसात 10 ग्रॅम सोन्याने 2000 रुपयांपेक्षा अधिकची झेप घेतली होती. तर आज सकाळी सोने तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत. दिवाळीपर्यंत सोने सव्वालाखांच्या घरात पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,07,780 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 98,810 रुपये इतका आहे.
चांदीत पडझड
गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीला चार दिवसात चांदी 2100 रुपयांनी महागली. पण 4 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर चांदीचे अवसान गळाले. तेव्हापासून चांदीत 1100 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीत आज सकाळच्या सत्रात पडझड दिसत आहे. आज सकाळच्या सत्रात चांदी 100 रुपयांनी घसरली असून एका किलोचा भाव 1,25,900 रुपयांवर पोहचली आहे. दिवाळीपर्यंत चांदी पण मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीत घसरण दिसून येत आहे. 24 कॅरेट सोने 1,06,340 रुपये, 23 कॅरेट 1,05,910, 22 कॅरेट सोने 97,410 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 79,750 रुपये, 14 कॅरेट सोने 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,23,170 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
