Hindenburg Adani : Ambulance च्या चालकाने हादरविले अदानी साम्राज्य, नाथन एंडरसन आहे तरी कोण?

| Updated on: Jan 31, 2023 | 5:38 PM

Hindenburg Adani : अदानी समूहाला हादरा देणारी हिंडनबर्ग संस्था आणि तिचा संस्थापक नाथन एंडरसन आहे तरी कोण?

Hindenburg Adani : Ambulance च्या चालकाने हादरविले अदानी साम्राज्य, नाथन एंडरसन आहे तरी कोण?
साम्राज्याला हादरे
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेत नावाजलेली संशोधन संस्था आणि शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गने (Hindenburg Research) अनेक उद्योग समूहांचे डोळे पांढरे केले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला ही हिंडनबर्गच्या अहवालाने हादरा दिला. समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप अहवालात करण्यात आला. त्यामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला. अदानी यांना 45 हजार कोटींचा फटका बसला. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर राहिली आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीतील त्यांच्या स्थानाला मोठा धक्का बसला. चौथ्या स्थानावरुन ते थेट सातव्या स्थानावर फेकल्या गेले आहेत. सध्या नेटकरी हिंडनबर्ग आणि तिचा संस्थापक नाथन एंडरसन (Nathan Anderson) याच्याविषयी माहिती घेत आहेत.

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक न्यायवैद्यक पद्धतीने आर्थिक संशोधन करणारी संस्था (Forensic Financial Research Firm) आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते.

या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही भयंकर इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

हिंडनबर्ग जगभरातील कोणत्याही कंपनीच्या आर्थिक बाजूचा कानोसा घेते. त्याचे विश्लेषण करते. त्यातील फसवणूक आणि फसव्या बाबी अहवालाद्वारे समोर आणते. मानवीय आपत्ती, फसवणूक समोर आणण्याचा विडा या संशोधन संस्थेने उचलला आहे.

कंपनीच्या लेखापरिक्षणातील गडबड, व्यवस्थापनाकडून होणारी फसवणूक, लपून छपून करण्यात येत असलेले व्यवहार यावर फर्मची बारीक नजर असते. तसेच रात्रीतूनच श्रीमंत होणाऱ्या आणि जास्त नफा कमाविणाऱ्या कंपन्यांवर ते लक्ष ठेवतात.

जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, नाथन एंडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून (University of Connecticut) आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी FactSet Research Systems Inc मध्ये काम केले आहे. अनेक गुंतवणूक व्यवस्थापन संस्था, फर्म यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईल या देशात अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम केले आहे. अत्यंत दबावात आपण चांगले काम करतो, असा या पठ्ठ्याचा दावा आहे. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे. मार्कपोलोस हे सुद्धा एक विश्लेषक आहे. त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) यांच्या एका योजनेचा भांडाफोड केला होता.

हिंडनबर्गने 2017 पासून आतापर्यंत जवळपास 36 कंपन्यांमधील फसवणूक, अनियमितता यांचा भांडाफोड केला आहे. ट्विटर आणि एलॉन मस्क यांनाही हिंडनबर्गने झटका दिला आहे. दरम्यान अदानी समूहाने या अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. पण तोपर्यंत या अहवालाने मोठे नुकसान केले आहे.