EPFO: लग्नासाठी किती रक्कम काढता येणार? एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करता येणार, ईपीएफओची अपडेट काय?
EPFO Marriage Withdrawal: लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून असं म्हटल्या जाते. या गरजेच्यावेळी EPFO PF मधून पैसा काढता येतो. पण आता एक मोठी आपडेट समोर आली आहे.

ईपीएफओ सातत्याने कात टाकत आहेत. अनेक नवीन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सोय होणार आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम काढण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. योगदान काढण्याची मर्यादा वाढली आहे. आता पात्र सदस्य लग्नासाठी कमाल 5 वेळा रक्कम काढता येईल. ईपीएफओने या गरजेच्या काळात कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
लग्नासाठी किती पैसे काढता येणार?
EPFO च्या नियमानुसार, लग्नासाठी कर्मचारी योगदान आणि त्यावरील मिळणारी 50% पर्यंतची रक्कम काढू शकतील. ही सुविधा कर्मचारी लग्नाव्यतिरिक्त मुलगा, मुलगी, भाऊ अथवा त्याच्या बहिणीच्या लग्नाकरिताही वापरू शकतील. समजा तुमच्या ईपीएफ खात्यात कर्मचारी योगदान आणि व्याजाची रक्कम मिळून एकूण 4 लाख रुपये असतील. तर या नवीन नियमानुसार, कमाल 2 लाखांची रक्कम काढता येईल.
आता किती वेळा काढता येईल पैसा?
यापूर्वी लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी तीन वेळा रक्कम काढता येत होती. पण आता EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने ऑक्टोबर 2025 पासून नियमात बदल केला आहे. त्यानुसार, लग्नासाठी आता 5 वेळा रक्कम काढता येणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना एकूण 10 वेळा रक्कम काढता येईल. याचा अर्थ एकदा रक्कम काढल्यावर गरज असल्यास कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा रक्कम काढता येईल. अर्थात त्यासाठी तुमच्या पीएफ खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे.
किती वर्षांची सेवा गरजेची?
नवीन बदलानुसार, पीएफमधून किमान रक्कम काढण्यासाठी कमीत कमी 12 महिने नोकरी करणे आवश्यक आहे. यापूर्वी लग्नाकरीता रक्कम काढण्यासाठी 7 वर्षांची सेवा असणे आवश्यक आहे. EPFO च्या बदलाचा फायदा कर्मचार्यांना होईल. त्यांना निकडीच्या वेळी ही रक्कम मिळणार आहे.
किती रक्कम काढता येईल हे कळेल
ईपीएफओने CITES 2.01 हे सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. नवीन प्रणालीमुळे सदस्यांना उपचार, घर खरेदी, लग्न, शिक्षण आदी कारणांसाठी ईपीएफ नियमांनुसार, जास्तीत जास्त किती रक्कम काढता येईल हे आधीच पाहता येईल. यामुळे सदस्यांना किती रक्कमेचा दावा करायचा हे ठरवणे सोपे होणार आहे.
