Jobs | कोण म्हणतंय, देशात रोजगार मिळाले नाही.. सरकारचा हा दावा तर काही वेगळंच सांगतो..

| Updated on: Sep 21, 2022 | 12:39 PM

Jobs | देशातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी त्यांनी आकडेवारीही जाहीर केली आहे.

Jobs | कोण म्हणतंय, देशात रोजगार मिळाले नाही.. सरकारचा हा दावा तर काही वेगळंच सांगतो..
बेरोजगारीचा आकडा घटला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारांना (unemployment) असंघटितच नाही तर संघटित क्षेत्रात (organized Sector) रोजगार मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था (Economy) झेपावत आहे. त्याचा परिणाम देशातंर्गत उद्योग वाढीत झाला. अशा उद्योगांमध्ये नवीन रोजगार निर्मिती वाढल्याचा सरकारचा दावा आहे.

देशातील संघटित क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) दाव्यानुसार, ही बाब समोर आली आहे. आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात ईपीएफओमध्ये 18.23 लाख नवीन सदस्य नोंदणी झाली आहे.

गेल्या वर्षी याच महिन्याशी आकड्यांचा ताळमेळ बसवला तर रोजगार उपलब्धीचे 24.48 टक्के प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकार संघटित क्षेत्रात रोजगार उपलब्धता वाढलेली असून बेरोजगारीचे मळभ दूर झाल्याचा दावा करत आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय रोजगार मंत्रालयाने मंगळवारी याविषयीचे अधिकृत वक्तव्य केले आहे. त्यानुसार, ईपीएफओमध्ये कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नोंदणी होते. या जुलै महिन्यात एकूण सदस्य संख्येत 10.58 लाख कर्मचाऱ्यांची पहिल्यांदा नोंदणी झाली आहे.

ईपीएफओकडे पीएफ खाते उघडण्यात आले म्हणजे नोकरीत सुरक्षा असल्याचे हे द्योतक मानण्यात येते. ईपीएफओने या वर्षी एप्रिलपासून सदस्य संख्या वाढीची आकडेवारी जाहीर केलेली आहे. यामध्ये जुलै महिन्यातही सदस्य संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

या नवीन सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची संख्या जवळपास 57.69% आहे. एकूण 10.58 लाख सदस्यांमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळे संघटित क्षेत्रात नव्याने नोकऱ्या उपलब्धतेचे आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढल्याचा सरकारचा दावा आहे.

या आकडेवारीत नोकरदार महिलांचा टक्काही वाढल्याचे दिसून आले. 27.54 टक्के महिलांना जुलै महिन्यात संघटित क्षेत्रात रोजगार मिळाल्याचे आकड्यांवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्या 12 महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे.