भारताची मोठी भरारी! तांदूळ उत्पादनात भारताने चीनला टाकले मागे; देशात विविध कृषी उत्पादनाची विक्रमी पातळी
Indian Surpassed China In Rice Production:तांदूळ उत्पादनात भारताची चीनवर मात बघायला मिळाली असून देशातील अन्नधान्य उत्पादनाने विक्रमी पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे, तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. हवामानाशी संबंधित विविध आव्हाने काही वर्षांपासून सुरु आहेत. काही ठिकाणी खूप पाऊस पडला तर काही ठिकाणी खूप ऊन पडलं. यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळंच गणित बिघडलं.पण तरीही भारताचे कृषी क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. देशातील अन्नधान्य उत्पादनाने विक्रमी पातळी गाठली असून, एकूण उत्पादन ३,७८५.३८ लाख टनांवर पोहोचले आहे. हे उत्पादन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नोंदवलेल्या ३,५७७.३२ लाख टनांच्या तुलनेत २०८.०६ लाख टनांनी अधिक आहे. एवढंच नाही तर भारताने चीनलाही मागे टाकलं आहे.
तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकले!
सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे भारताने चीनला मागे टाकले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी, तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकत जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी तांदळाचे उत्पादन १५५.१५४ दशलक्ष टन इतके झाले आहे, तर २०२४-२५ च्या कालावधीत हे उत्पादन १५०.१८४ दशलक्ष टन होते. म्हणजेच, तांदूळ उत्पादनात ४.९७ दशलक्ष टनांची वाढ झाली आहे.
गहू उत्पादनातही टॉप! भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर
फक्त तांदूळचं नाही तर गहूनेही रेकॉर्ड केला आहे. भारतात यंदा गव्हाचे विक्रमी पीक आले असून, एकूण उत्पादन १२२०.६४ लाख टनांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. या आकडेवारीमुळे गहू उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तुलना करायची झाल्यास, मागील वर्षी गव्हाचे उत्पादन ११७९.४५ लाख टन होते; म्हणजेच ताज्या आकडेवारीनुसार त्यात ४१.१९ लाख टनांची वाढ झाली आहे.
मक्याच्या उत्पादनातही मोठी वाढ
एकीकडे भारतीय बाजारपेठेत बाहेरच्या स्वीट कॉर्नचा जास्त बोलबाला असताना भारताच्या मक्याने बाजी मारली आहे. तांदूळ आणि गव्हाव्यतिरिक्त, मक्याच्या उत्पादनातही मोठी वाढ दिसून आली. मक्याचे उत्पादन २०२४-२५ मधील ४३४.०९ लाख टनांवरून वाढून २०२५-२६ मध्ये ५५०.२५ लाख टनांवर पोहोचले. उपलब्ध आकडेवारीनुसार, मक्याच्या उत्पादनात सर्वाधिक, म्हणजेच ११६.१६ लाख टनांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील कडधान्यांचे उत्पादनही मागील वर्षाच्या २५६.८३ लाख टनांवरून वाढून २०२५-२६ मध्ये २७२.४० लाख टनांवर पोहोचले आहे.
आव्हानानांच्या दरम्यानही भारतीय कृषी विभागाची दमदार प्रगती सुरूच
राष्ट्रीय अन्नधान्य उत्पादनातील वाढीमध्ये खरीप उत्पादनाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, ते गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. विशेष म्हणजे, हवामानाच्या दृष्टीने खरीप हंगाम आव्हानात्मक ठरला होता. ‘एल निनो’च्या (El Niño) पुनरागमनामुळे नैऋत्य मान्सूनच्या आगमनात विलंब झाला आणि जून महिन्यात पावसाचे प्रमाण सामान्य पातळीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्क्यांनी कमी नोंदवले गेले. या सर्व अडचणींनंतरही, २०२६-२७ या वर्षासाठी खरीप अन्नधान्य उत्पादन १,६७१.४३ लाख टन इतके होईल असा अंदाज आहे, जे मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ९७.६७ लाख टनांनी अधिक आहे.
