भारतातील ‘ही’ व्हिस्की जगभरात प्रसिद्ध, एका बाटलीची किंमत तब्बल 5 लाख रुपये
भारतासह जगभरात मोठ्या आवडीने व्हिस्की प्यायली जाते. बाजारात व्हिस्कीचे जगभरातील वेगवेगळे ब्रॅण्ड उपलब्ध आहेत. मात्र भारतातील एका खास सिंगल माल्ट व्हिस्कीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

भारतासह जगभरात मोठ्या आवडीने व्हिस्की प्यायली जाते. बाजारात व्हिस्कीचे जगभरातील वेगवेगळे ब्रॅण्ड उपलब्ध आहेत. मात्र भारतातील एका खास सिंगल माल्ट व्हिस्कीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. ही व्हिस्की म्हणजे रामपूरमधील सिग्नेचर रिझर्व्ह. ही सामान्य व्हिस्की नाही, उत्कृष्ट दर्जा आणि खास वैशिष्ट्यामुळे ती भारतातील सर्वात महागडी सिंगल माल्ट व्हिस्की आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह ही व्हिस्की भारतातील सुप्रसिद्ध कंपनी रेडिको खेतानद्वारे उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका डिस्टिलरीत तयार केली आहे. येथे 1943 पासून दारू बनवली जात आहे. रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह ही भारतातील सर्वात महागडी व्हिस्की आहे. या व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत 5 लाख रुपये आहे. या व्हिस्कीची किंमत जास्त असली तरीही मद्यप्रेमींमध्ये तिची मागणी जास्त आहे.
कमी प्रमाणात बनवली जाते
रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह ही खूप कमी प्रमाणात बनवली जाते. या व्हिस्कीच्या फक्त 400 बाटल्या बनवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक बाटलीची किंमत 5 लाख रुपये आहे, मात्र या व्हिस्कीची मागणी जास्त असल्याने या सर्व बाटल्या कमी काळात विकल्या गेल्या.
रॅडिको खेतानने रामपूर डिस्टिलरीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय बाजारात ही खास व्हिस्की लाँच केली होती. भारतातील बदलणाऱ्या हवामानामुळे ही व्हिस्की अमेरिकन ओक बॅरलमध्ये ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही व्हिस्की जेरेझ, स्पेन येथे पीएक्स शेरी बट्समध्ये मॅच्युअर होण्यासाठी पाठवण्यात आली होती. ज्यामुळे व्हिस्कीची चव आणखी वाढली होती. या 400 बाटल्यांवर कंपनीचे अध्यक्ष आणि मास्टर मेकर डॉ. ललित खेतान यांची स्वाक्षरी देखील प्रिंट करण्यात आली होती.
बाजारात रामपूरमधील इतरही व्हिस्की उपलब्ध
रामपूरमधील इतरही सिंगल माल्ट व्हिस्की बाजारात उपलब्ध आहे. रामपूर डबल कास्कची किंमत 8500 रुपये आहे. तर रामपूर पीएक्स शेरी एडिशनची किंमत 12000 रुपये आहे आणि रामपूर सिलेक्टची किंमत 14000 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या रामपूर आस्वाची किंमत सुमारे 10990 रुपये आहे. तर सर्वात प्रीमियम प्रकारातील रामपूर जुगलबंदी या व्हिस्कीची एक बाटली 40000 रुपयांना आहे. मात्र रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह आता बाजारात उपलब्ध नाही. या खास व्हिस्कीच्या 400 बाटल्या विकल्या गेल्याने ही व्हिस्की आता मद्यप्रेमी खरेदी करू शकत नाहीत.
