90 तास काम करायची इच्छा, पण L&T ला मोठा झटका, 70 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट गमावलं ?
संरक्षण मंत्रालयाने लार्सन अँड टुब्रो कंपनीने 70,000 कोटी रुपये खर्चून 6 पाणबुड्या खरेदी करण्यासाठी दिलेली बोली नाकारली आहे. नुकतेच कंपनीच्या L&T अध्यक्षांनी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.

देशातील मोठी इंजिनिअरिंग कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रो कॉग्निजेंट अर्थात L&T ला मोठा झटका बसला आहे. खरंतर संरक्षण मंत्रालयाने 6 पाणबुड्या बांधण्याची L&T ची बोली नाकारली आहे. या निर्णयामुळे कंपनीचे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. सरकारने 6 पाणबुड्या विकत घेण्यासाठी 70 हजार कोटी रुपयांचे टेंडर जारी केलं होतं. त्यासाठी लार्सन अँड टुब्रोने स्पेनची आघाडीची संरक्षण क्षेत्रातील कंपनी नवांतिया (Navantia) सोबत बोली लावली होती. मात्र, कंपनीने अटी पाळल्या नसल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीने हे टेंडर गमावलं आहे.
त्यामुळे आता L&T यातून बाहेर पडल्यानंतर, जर्मन संरक्षण क्षेत्रातील प्रमुख ThyssenKrupp Marine Systems (TKMS) आणि Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) हीच आता पाणबुडी प्रकल्पासाठी एकमेव दावेदार उरली आहे. हा करार साध्य करण्यासाठी हे जॉईंट व्हेंचर सध्या उत्तम स्थितीत आहे.
आठवड्याला 90 तास काम, मुद्यावरून माजला होता गदारोळ
काही दिवसांपूर्वीच L&T चे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात 90 तास काम करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्याआधी इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास कामाचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्या त्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी विविध मतं मांडली. त्यानंतर काही दिवसांनी L&T चे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी एका कार्यक्रमात आठवड्याला 90 तास काम करण्याबद्दल वक्तव्य केलं, जे बरंच चर्चेत आलं. त्या वरून अनेक वादही झाले. सुब्रह्मण्यन हे जबरदस्त ट्रोलही झाले.
काय म्हणाले होते L&T चे चेअरमन ?
L&T चेअरमन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की कंपनीत 90 तास काम करायला हवं. कर्मचाऱ्यांकडून रविवारी मी काम करून घेऊ शकत नाही, याबद्दल मला खेद वाटतो. रविवारी कर्मचाऱ्यांनी काम केले तर मला जास्त आनंद मिळेल. आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देताना त्यांनी हे वक्तव्यही केले होते. ते म्हणाले, ‘तुम्ही घरी बसून काय करणार ? किती वेळ तुमच्या बायकोकडे टक लावून पाहणार ? घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, असा अजब सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला, त्यांच्यावर टीका केली.
