LPG सिलेंडरचा भाव घसरला, केंद्र सरकारने दिला पुन्हा दिलासा
LPG Price | देशातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा घसरल्या. केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले. सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने महागाई आटोक्यात येण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. सिलेंडरचे भाव कमी झाल्याने हॉटेलिंग आणि बाहेरील खाद्यपदार्थ स्वस्त मिळतील. देशातील चार प्रमुख शहरातील किंमती अशा कमी झाल्या.
नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : देशातील चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्ह एकदा कमी झाल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी संपली असली तरी उत्तर भारतात छट पुजेचे अनन्यसाधरण महत्व आहे. या काळात केंद्र सरकारने हा दिलासा दिला आहे. नवीन किंमती गुरुवारपासून लागू झाल्या आहेत. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्या आहेत. सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमधील सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत.
15 दिवसांपूर्वी दरवाढ
केंद्र सरकारने 15 दिवसांपूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली होती. तर यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत 1731.50 रुपये, कोलकत्तामध्ये 1839.50 रुपये, मुंबईमध्ये 1684 रुपये तर चेन्नईत हा दर 1898 रुपये होता.
आता काय आहे भाव
देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 57.50 रुपयांनी स्वस्त झाले. आता 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमती दिल्लीत 1775.50 रुपये झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा भाव 1833 रुपये होता. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पण किंमती कमी झाल्या आहेत. कोलकत्तामध्ये 1885.50 रुपये, मुंबईत 1728 रुपये आणि चेन्नईमध्ये 1942 रुपये झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी हा भाव कोलकत्तामध्ये 1943 रुपये, मुंबईत 1785.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपये होता.
घरगुती सिलेंडरची किंमत
घरगुती सिलेंडरचे ग्राहक इतके नशीबवान नाहीत. गेल्या काही वर्षांपासून सिलेंडरचे भाव सातत्याने वाढत आहे. कधीकाळी 500 रुपयांच्या आत मिळणारे सिलेंडर आता एक हजारांच्या घरात मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये होता.
यापूर्वी केली होती कपात
गेल्या 4 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कॅबिनेटने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 9.5 कोटी लाभार्थ्यांना 100 रुपयांची सबसिडी मंजूर केली होती. यापूर्वी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात देशातील सर्वसामान्य जनतेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांच्या सबसिडीला मंजूरी दिली होती. सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक सिलेंडरसाठी 603 रुपये मोजावे लागतात. तर सर्वसामान्य जनतेला दिल्लीत 903 रुपये द्यावे लागतात. प्रत्येक शहरात या किंमतीत तफावत दिसून येते.