
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम (NMACC) रद्द केला आहे. हा कार्यक्रम 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान होणार होता. न्यूयॉर्कमधील लिंकन सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये होणार होता. सेंटरने हा कार्यक्रम सध्या स्थगित केल्याची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा या सारखे दिग्गज सहभागी होणार होते.
तिकीटाचे पैसे परत
NMACC ने या सर्व घटनाक्रमावर खेद व्यक्त केला आहे. NMACC इंडिया विकेंड हा कार्यक्रम 12 सप्टेंबर 2025 रोजी न्यूयॉर्क येथे सुरू होणार होता. पण अचानक उद्धभवलेल्या परिस्थितींमुळे ते स्थगित करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात या उत्सवासाठी आम्ही मोठी तयार केली. देशातील अनेक खास कलाकारांसोबत मिळून भारताची संस्कृती दाखवण्यात येणार होती. प्रत्येक मंच चागंल्यारित्या सजवण्यात आला होता. आम्ही कलाप्रकार सादर करण्यासाठी उत्सुक होतो. पण सध्याची परिस्थिती पाहता त्याची अंमलबजावणी करणे आता शक्य नसल्याचे कळवण्यात आले आहे.
NMACC नुसार, The Great Indian Musical : Civilization to Nation आणि The Great Indian Festival ची तिकीटं ज्यांनी खरेदी केली आहे. त्यांना ती परत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला आहे. हा एक स्वल्पविराम आहे. लवकरच नवीन तारीख कळवण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
दोन्ही देशातील तणावामुळे हा निर्णय
भारत आणि अमेरिकेत सध्या व्यापार, व्यवसाय आणि उद्योग स्तरावर मोठा तणाव दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून इंधन खरेदीमुळे भारतावर टीकास्त्रच सोडले नाही तर टॅरिफ आणि दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतावर 25 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ सुद्धा लावला आहे. त्यात अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाकडून आयात केलेल्या कच्चा तेलाचाही मोठा वाटा आहे. या कच्चा तेलावर प्रक्रिया करून गॅस आणि इंधनाचा पुरवठा अमेरिकेसह युरोपला करण्यात येतो हे विशेष.