दैनंदिन जीवनाशी निगडीत ‘हे’ महत्त्वाचे नियम 2021मध्ये बदलणार, जाणून घ्या काय होणार…

दैनंदिन जीवनाशी निगडीत ‘हे’ महत्त्वाचे नियम 2021मध्ये बदलणार, जाणून घ्या काय होणार...

एका आठवड्यानंतर, केवळ आपल्या कॅलेंडरमधील तारीख बदलणार नाहीतर, अनेक महत्त्वाचे नियम देखील पूर्णपणे बदलले जाणार आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Dec 26, 2020 | 11:32 AM

मुंबई : एका आठवड्यानंतर, केवळ आपल्या कॅलेंडरमधील तारीख बदलणार नाहीतर, अनेक महत्त्वाचे नियम देखील पूर्णपणे बदलले जाणार आहेत. हे महत्त्वाचे नियम आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. बँकिंगपासून व्यवसायापर्यंत तसेच लँडलाईन फोन आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही नवीन नियम लागू होणार आहेत. परंतु, असे ही काही नियम आहेत जे थेट 1 जानेवारीपासून लागू होणार नसले तरी त्याचा परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. तुम्ही देखील हे महत्त्वाचे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे (New Rules on these things will be applicable from 1 January 2021).

5000 रुपयांपर्यंत कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट

1 जानेवारी 2021 पासून बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे व्यवहार मर्यादा वाढवण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या नवीन चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या नवीन वर्षात ग्राहक एकाच वेळी 2000 रुपयांऐवजी 5000 रुपयांपर्यंतचे व्यवहार कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटने करू शकतील.

चेक संबंधित नवीन नियम

नवीन वर्षात चेकद्वारे पैसे देण्याचे नियमही बदलणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने धनादेशाशी संबंधित नियमांमध्येही बदल केले आहेत. RBI कडून 1 जानेवारीपासून पॉझिटिव्ह पे स्टिस्टिम लागू केली जाणार आहे. या आधारे 50 हजाराहून अधिक रकमेच्या व्यवहाराच्या धनादेशाची कडक तपासणी केली जाणार आहे. पॉझिटिव्ह पे नुसार, जेव्हा चेक चेक देताना त्याचा संपूर्ण तपशील बँकेला द्यावा लागणार आहे. यामध्ये धनादेश जारी करणार्‍यास इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा मोबाइल बँकिंगद्वारे लाभार्थ्याचे नाव, खाते क्रमांक, एकूण रक्कम व अन्य आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे.

कार, ​​दुचाकी महागणार

जानेवारी 2021पासून देशात मोटारींच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढतील. मारुती सुझुकी इंडिया, निसान, रेनॉल्ट इंडिया, होंडा कार्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड इंडिया, इसुझु, बीएमडब्ल्यू इंडिया, ऑडी इंडिया, फॉक्सवॅगन या कार कंपन्यांनी जानेवारीपासून किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षात कंपन्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही 1 जानेवारीपासून बाईक-स्कूटरच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे (New Rules on these things will be applicable from 1 January 2021).

सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य

1 जानेवारी 2021पासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही ही घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2021पासून नवीन वाहनांसाठी तसेच, 1 डिसेंबर 2017पूर्वी विकल्या गेलेल्या सगळ्या वाहनांसाठी फास्टॅग देखील अनिवार्य असेल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या या नियमानुसारनुसार, फास्टॅग लावल्यानंतरच माल वाहतूक वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्रचे नूतनीकरण करणे शक्य होणार आहे. नवीन थर्ड पार्टी विमा घेण्यासाठी देखील फास्टॅग अनिवार्य असणार आहे.

सरल जीवन विमा

विमा नियामक आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना पुढील वर्षी 1 जानेवारीपासून ‘सरल जीवन विमा’ सुरू करण्यास सांगितले आहे. हा एक प्रमाणित मुदतीचा विमा असेल. यामुळे ग्राहकांना कंपन्यांनी आधीच पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या सर्व विमा कंपन्यांना पुढील वर्षी 1 जानेवारीपासून मानक जीवन विमा उत्पादन आणणे आवश्यक आहे. 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक सरल जीवन विमा खरेदी करण्यास पात्र असतील आणि ही पॉलिसी 5 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असेल.

जीएसटी ई-इनव्हॉईसिंग सिस्टममध्ये बदल

वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत, 1 जानेवारी 2021 बी-टू-बी (व्यवसाय ते व्यवसाय) व्यवहारासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीसाठी ई-पावत्या आवश्यक असणार आहे. त्याच वेळी, 1 एप्रिल 2021पासून, सर्व करदात्यांसाठी बी-टू-बी व्यवहारांचे ई-इनव्हॉइस आवश्यक असेल. ही नवी प्रणाली फिजिकल इनव्हॉइसची जागा घेईल. लवकरच सिस्टम लागू होईल आणि करदात्यास स्वतंत्रपणे ई-वे बिल तयार करण्याची गरज भासणार नाही.

छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा

पाच कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना पुढील वर्षाच्या जानेवारीपासून वर्षासाठी फक्त चार इन्कम टॅक्स रिटर्न (GSTR-3B) भरावा लागले. सध्या या व्यापाऱ्यांना मासिक तत्वावर 12 परतावे भरावे लागत होते. पुढील वर्षी जानेवारीपासून छोट्या व्यावसायिकांना एका वर्षात केवळ चार जीएसटीआर -3 बी आणि चार जीएसटीआर-1 परतावे भरावे लागणार आहेत. मासिक कर भरणा योजनेसह तिमाही रिटर्न फाइलिंग (क्यूआरएमपी) योजनेचा परिणाम सुमारे 94 लाख करदात्यांना होणार आहे (New Rules on these things will be applicable from 1 January 2021).

यूपीआयच्या नियमांत बदल

एनपीसीआयने सर्व थर्ड पार्टी अ‍ॅप प्रदात्यांना (टीपीएपी) लागू यूपीआयमध्ये प्रक्रिया केलेल्या व्यवहाराच्या एकूण खर्चावर 30 टक्के इतकी मर्यादा घातली आहे. हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होणार आहे. ही 30 टक्के मर्यादा मागील तीन महिन्यांत यूपीआयद्वारे केलेल्या एकूण व्यवहाराच्या आधारावर मोजली जाईल.

‘या’ फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही!

पुढील वर्षापासून, काही Android आणि iOS स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाहीय. हे मेसेजिंग अॅप केवळ Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम आणि आयओएस 9च्या वरील व्हर्जनमध्येच चाणार आहे. त्याखालील व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी वापरकर्त्याला आपला फोन अपडेट करणे आवश्यक आहे.

मोबाईल नंबर 11 अंकी होणार!

दूरसंचार विभागानं जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आता लॅन्डलाईनवरुन मोबाईल नंबरवर कॉल करण्यासाठीचे नियम बदलण्यात आले आहेत. 15 जानेवारीपासून कुणी लॅन्डलाईनवरुन मोबाईल नंबरवर फोन करत असेल तर त्याला आता मोबाईल नंबर डायल करण्यापूर्वी शून्य दाबावा लागणार आहे.

(New Rules on these things will be applicable from 1 January 2021)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें