स्विगीवरुन जेवण मागवताय, खिशाला पडणार चाट, प्रत्येक ऑर्डरमागे इतके जादा शुल्क
सणासुदीच्या तोंडावर ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी स्विगीने आपल्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे स्विगीवरुन अन्नपदार्थ मागवणे महाग होणार आहे.

सणासुदीच्या दिवसात ऑर्डर्सची मागणी वाढल्याचा फायदा उचलण्यासाटी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे स्विगीवरुन जेवण मागवणे महाग होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने नुकतीच आपली शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा सणाच्या तोंडावर फि वाढल्याने ऑनलाईन पदार्थांची ऑर्डर करणे चांगलेच महाग होणार आहे.
सणाच्या निमित्ताने मागणी वाढल्याने त्याचा लाभ पदरात पाडण्यासाठी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या शुल्कात वाढ केली आहे. आता दर फूड डिलीव्हरी ऑर्डरवर कंपनी १४ रुपये आकारणार आहे. आधी कंपनी १२ रुपये आकारात होती,म्हणजे २ रुपयांनी शुल्क वाढले आहे. कंपनीच्या मते प्रत्येक ऑर्डरवर नफा वाढेल आणि एकूण वित्तीय स्थिती आणखी मजबूत होईल, विशेष म्हणजे स्विगी कंपनीने अलिकडेच दरवाढ केली होती.
का वाढवले शुल्क ?
स्विगीने एप्रिल २०२३ मध्ये प्रथम प्लॅटफॉर्म फि स्विकारणे सुरु केले होते. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे प्रति ऑर्डर नफा वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले होते. गेल्या दीड वर्षात कंपनीने अनेकदा फि वाढवली आहे. विशेष म्हणजे किंमत वाढूनही ऑर्डरच्या संख्येवर कोणताही विपरीत परीणाम झालेला नाही. सण आणि हायडीमांड असल्याने आधीही स्विगी आणि त्याचा स्पर्धक झोमॅटो यांनी फी वाढवली होती. जर ऑर्डरच्या संख्ये घसरण झाली नाही, तर हा बदल बराच काळ लागू रहातो.
कंपनीच्या कमाईवर परिणाम
स्विगी दररोज २० लाखाहून अधिक ऑर्डर डिलिव्हरी करते. अशा प्रत्येक ऑर्डरमागे जर दोन रुपये अतिरिक्त मिळाले तर कंपनीला रोज सुमारे २.८ कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. तिमाहीत ही रक्कम ८.४ कोटी रुपये होईल. आणि वर्षभर ही रक्कम ३३.६ कोटींचा अतिरिक्त महसुल मिळवून देईल. कंपनी सणाच्या नंतर पुन्हा आपली फि पूर्वी प्रमाणे १२ रुपये करु शकते. परंतू गेल्या अनुभव पाहाता जर ऑर्डरची संख्या कमी झाली नाही तर ही दरवाढ कायम राहण्याचीही शक्यता आहे.
स्विगीची आर्थिक स्थिती
स्विगीने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा त्यांच्या तोट्यात वेगाने वाढ झाली आहे. साल २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नेट लॉस १,१९७ कोटी रुपये होता. जो गेल्या तिमाहीतील ६११ कोटी रुपयांहून ९६ टक्के जास्त आहे. गेल्या तिमाहीत देखील कंपनीला १,०८१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीने तोट्यामुळे इंस्टामार्ट ( वेगाने किराणा सामान डिलिव्हरी ) मध्ये गुंतवणूक करीत विस्तार केला होता.
महसुलात वाढ
तोटा जरी वाढला असला तरी कंपनीचे उत्पन्न देखील वेगाने वाढत आहे. पहिल्या तिमाहीत स्विगीचे ऑपरेशनल रेव्हेन्यू ५४ टक्के वाढून ४,९६१ कोटी रुपये झाले होते. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे ३,२२२ कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीत कंपनीची महसूल ४,४१० कोटी रुपये होता.
झोमॅटोशी तुलना
स्विगीची स्पर्धक झोमॅटोचा नफा या तिमाहीत ९० टक्के कोसळून २५ कोटी रुपये झाला.तरी कंपनीचा महसुल ७०.४ टक्के वाढून ७,१६७ कोटी रुपये झाला आहे. स्विगीने सणाच्या सिझनमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मची फी वाढवून नफा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी वेगाने वाढणाऱ्या ऑर्डर आणि इंस्टामार्ट सारखे नवीन बिझनस मॉडेलवरही गुंतवणूक करीत आहे.
