रतन टाटा यांच्या जवळच्या व्यक्तीने या कंपनीचा चेअरमनपदाचा दिला राजीनामा, काय आहे कारण?
दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या जवळचे व्यक्तीमत्व आणि टाटा केमिकल्सचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रात राजीनामा देण्याचे कारण दिले आहे.

Ratan Tata: देशातील सर्वात मोठा उद्योग समूह टाटा ग्रुपमध्ये बदल होताना दिसत आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा केमिकल्समध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. टाटा केमिकल्सचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे संचालक एस.पद्मनाभन यांना नवीन चेअरमन बनवण्यात आले. चंद्रशेखरन हे स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांचे जवळचे व्यक्ती समजले जातात. रतन टाटा यांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. सन 2017 मध्ये त्यांना टाटा सन्सचे चेअरमन करण्यात आले होते.
राजीनामा दिल्याचे दिले कारण
एन. चंद्रशेखरन यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळाला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी टाटा केमिकल्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा देण्याचे कारण दिले आहे. त्यांनी म्हटले की, माझ्याकडे खूप काम आहे. तसेच ही कामे पुढेही वाढणार आहेत. त्यामुळे आपण हे पद सोडत आहोत. चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा केमिकल्सचे 9 कोटी रुपयांचे शेअर आहे. ते नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळात दाखल झाले होते.
काय आहे नियम
नियमानुसार कोणताही व्यक्ती 20 कंपन्यांचा संचालक बनू शकतो. त्यात प्रायव्हेट, पब्लिक, लिस्टेड आणि अनलिस्टेड सर्व कंपन्यांचा सहभाग आहे. टाटा मोटर्सची विभाजनी आता दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होत आहे. चंद्रशेखरन यांना या ऑटोमोबाइल कंपनीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. नुकतेच त्यांना रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे चेअरमनपदही देण्यात आले. या फाउंडेशनकडे टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर आहे. या शेअरची किंमत 2,750 कोटी रुपये आहे.
20 कंपन्यांमधून कोणताही व्यक्ती 10 पब्लिक कंपन्यांचा बोर्डात सहभागी होऊ शकतो. तसेच सात लिस्टेड कंपन्यांचा संचालक होऊ शकतो. टाटा केमिकल्सने मोदन साहा यांनाही अतिरिक्त संचालक केले आहे. मोदन साहा टाटा सन्समध्ये स्ट्रेटेजी हेड आहेत. चंद्रशेखरन सन 1987 मध्ये एक इंटर्न म्हणून टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेजमध्ये आले. सन 2007 मध्ये त्यांचा टीसीएस बोर्डात समावेश करण्यात आला. सन 2009 मध्ये ते टीसीएसचे सीईओ झाले होते.
