Rule Change: 1 डिसेंबरपासून देशात लागू होतील हे मोठे बदल, प्रत्येक घर, प्रत्येक खिशावर होईल परिणाम
Rule Change on 1 December: प्रत्येक नवीन महिन्यात काही ना काही आर्थिक बदल होताना दिसत आहेत. उद्यापासून डिसेंबर महिना सुरु होत आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी अनेक मोठे बदल दिसतील. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.

उद्यापासून डिसेंबर महिना सुरू होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल दिसतील. 1 डिसेंबर रोजी घरातील स्वयंपाक घरापासून ते पेन्शनर्सपर्यंत अनेक बदल दिसतील. भारतीय तेल उत्पादक कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतील आणि नवीन बदल काय आहेत ते समोर आणतील. एलपीजी सिलेंडर महागणार की स्वस्त होणार हे उद्या समोर येईल. तर पेन्शनबाबत नवीन नियम लागू होतील.
पहिला मोठा बदल-LPG सिलेंडरचा भाव
पहिला मोठा बदल घरगुती आणि व्यावसायिक गॅसबाबत होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल दिसतो. 1 डिसेंबर रोजी नवीन किंमती लागू होतील. गेल्या काही महिन्यांपासून 19 किलोग्रॅम LPG Gas Cylinder च्या किंमतीत अनेकदा बदल दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात गॅस किंमतीत 6.50 रुपयांची कपात दिसली. तर 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत दीर्घकाळापासून स्थिर आहेत. त्यात बदल झालेला नाही.
आधारकार्ड अपडेट सोपं
आधारकार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक यासारखा वैयक्तिक तपशील पूर्णपणे ऑनलाईन अपडेट करता येईल. नवीन प्रक्रियेतंर्गत पॅनकार्ड आणि पासपोर्ट सारख्या संबंधित सरकारी नोंदींद्वारे माहितीचा पडताळा करतील. यामुळे नागरिकांना अपडेटसाठी प्रत्येकवेळी पोस्टात अथवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही.
पेन्शन योजना निवडीची अखेरची संधी
पेन्शन योजना, युनिफाईड पेन्शन स्कीम नोंदणी करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. राष्ट्रीय पेन्शन सिस्टिम मधून या योजनेत जाऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आज 30 नोव्हेंबर हा अखेरचा पर्याय आहे. केंद्र सरकारने यापूर्वी अंतिम मुदत वाढ दिली होती. त्यानंतर आज ही पेन्शन योजना निवडीसाठी अखरेची संधी देण्यात आली आहे. तर काही जण अजून एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवत आहेत.
तात्काळ तिकीट बुकिंगसंदर्भात मोठा निर्णय
तात्काळ तिकीटासाठी आता OTP पडताळा अनिवार्य असेल. पश्चिम रेल्वेने याविषयीचा निर्णय घेतला आहे. नवीन मार्गदर्शकतत्वानुसार, प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीचे व्हिरिफिकेशन केल्याशिवाय तिकीट मिळणार नाही. हा नियम 1 डिसेंबर 2025 रोजीपासून लागू होणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या ट्रेन बुकिंगवेळी हा नियम नक्की लक्षात ठेवा.
जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी
केंद्राने प्रत्येक पेन्शनधारकाला जीवन प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केले आहे. यंदा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अखेरची तारीख ही 30 नोव्हेंबर ही आहे. परिणामी 1 डिसेंबरपासून पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार नाही.
