नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) वाढ सुरूच आहे. आज कच्च्या तेलाचे दर 123 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ सुरू असताना देखील भारतात पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे, मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसताना दिसून येत आहे. सध्या भारताला रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या दरात तीस टक्के सूट देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत रशियाकडून मोठ्याप्रमाणात कच्चे तेल आयात करण्यात येत आहे. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याचे बोलले जात आहे.