‘वधारे वधारे लेवानु’, याच गुरुमंत्राने राकेश झुनझुनवाला करोडपती, शेअर बाजारात भूकंप आलेला असताना का व्हायरल होत आहे ती स्टोरी?
Radhakishan Damani Guru Mantra to Rakesh Jhunjhunwala: शेअर बाजारात भूकंप आलेला असताना सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात राधाकिसन दमाणी हे 'वधारे, वधारे लेवानु' असा मंत्र राकेश झुनझुनवाला यांना देत आहेत. काय आहे हा गुरुमंत्र आणि आता का होतोय हा व्हिडिओ व्हायरल?

Radhakishan Damani Guru Mantra to Rakesh Jhunjhunwala: राजकीय फडात मराठीचे नारे घुमत असतानाच शेअर बाजारात “वधारे, वधारे लेवानु”, या गुजराती तीन शब्दांनी धुमाकूळ घातला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात भूकंप आला असताना हा गुरूमंत्र व्हायरल झाला आहे. डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) यांनी बिग बुल म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना गुरू मंत्र दिला होता. हाच तो गुरुमंत्र ज्यामुळे झुनझुनावाला हे करोडपतीच नाही तर अब्जाधीश झाले. आता त्यांचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मजेशीर आहे. पण या गुरुमंत्रामागे एक मोठं तत्वज्ञान लपलं आहे.
त्या चोराचे उदाहरण देऊन समजावली स्टोरी
राकेश झुनझुनवाला या व्हिडिओत एक गोष्ट सांगताना दिसत आहेत. त्यानुसार, राधाकिसन दमाणी यांनी त्यांना शिकवलं होतं की ट्रेडिंग हा खरा तर मोमेंटमचा खेळ आहे. यादरम्यान ते गुजराती भाषेत ‘वधारे-वधारे लेवानु’ असे म्हणतात. त्यांनी हा गुरुमंत्र डिकोड करताना एक मजेशीर उदाहरणं दिलं. त्याची पण यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. बाजार कोसळत असताना हा गुरुमंत्र सर्वच गुंतवणूकदारांमध्ये व्हायरल झाला आहे.
झुनझुनवाला यांनी सांगितले की, जर रस्त्यावर एखादा चोर पकडला तर सर्वच जण त्याला चापट मारतात. त्याला ठोकतात. तेव्हा तुम्ही पण त्या चोराला 2-3 चापट लगावू शकता. पण लक्षात ठेवा की सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणाहून धूम ठोकायची आहे. या उदाहरणातून ते एक मोठं तत्वज्ञान सांगतात की बाजारात गर्दीसोबत जाणे हे फायदेशीर ठरतंच. पण समयसूचकता महत्त्वाची आहे. वेळ येण्यापूर्वीच, म्हणजे नुकसान होण्यापूर्वीच तुम्ही तुमचं चंबूगबाळं उचलून बाजारातून बाहेर पडायला हवे.
“Radhakishan Damani told me that Trading is basically Momentum. Vadhare vadhare levanu”
“Just as – If a thief gets caught on road and everyone is slapping him, you can also give him 2-3 slaps. But ensure you are the 1st to run after slapping him.”😂
– Late Rakesh Jhunjhunwala pic.twitter.com/VcGQvSFFQ8
— CA Ronit Pereira (@Ronitper) January 7, 2026
राधाकिशन दमाणी कोण आहेत? (Who is Radhakishan Damani)
राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या डीमार्ट या रिटेल मॉलचे (DMart Founder)संस्थापक आहेत. ते लाँग टर्म व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये विश्वास ठेवतात. फोर्ब्सनुसार, दमाणी यांची एकूण संपत्ती ही 15.4 अब्ज डॉलर (1.41 लाख कोटी) इतकी आहे. ते अत्यंत कमी बोलतात पण जेव्हा ते बोलतात तेव्हा अनेकांना बाजारातील तत्वज्ञान कळतं आणि बाजारात गुंतवणूकदार मोठी काहीतरी कृती करतात.
बिग बुल राकेश झुनझुनवाला
राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हटल्या जाते. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचा 40 वर्षांहून अधिक अनुभव होता. गुंतवणूकदारांनी त्याच्या टिप्स पाळल्या. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता. 2003 साली टाटा समूहाच्या टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या त्यांच्या निर्णयाने नशीब पालटले. त्यांनी सहा कोटी शेअर्स अवघ्या 3 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे खरेदी केले आणि या शेअर्सनी त्यांना भारतीय शेअर बाजारात बिग बुल केले. शेअर बाजारात कोणीच राजा (Share Market King) नसतो, हे त्यांचे वाक्य अनेकांनी त्यांच्या काळजावरुन कोरुन ठेवले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांचे निधन झाले.
