आजपासून परीक्षा, पटकन रिझल्ट अन् चटकन नोकरी… केडीएमसीत या पदावर काम करण्याची सुवर्णसंधी, तुम्ही अर्ज केलाय का?
४९० पदांसाठी तब्बल ५५ हजार उमेदवार रिंगणात असून राज्यातील १४ जिल्ह्यांमधील २५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोणकोणत्या पदासाठी परीक्षा आणि निकाल कधी?, जाणून घ्या सगळं काही..

कल्याण-डोंबिवलीत बहुप्रतिक्षित नोकरभरती प्रक्रियेची आजपासून सुरुवात झाली आहे. 490 पदांसाठी तब्बल 55 हजार अर्जदार रांगेत आहेत. या भरतीसाठी 14 जिल्ह्यांमधील 25 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य म्हणजे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांचा ताण, पालिकेची तयारी आणि परीक्षेच्या सुरक्षेवर सर्वांचे लक्ष खिळले आहे.
कधी ते कधी परीक्षा ?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 21 संवर्गांमधील 490 पदांसाठी नोकरभरतीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली. या भरती प्रक्रियेसाठी थोडथोडक्या नव्हे तर तब्बल 55 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही परीक्षा 9 ते 12 प्टेंबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे.
त्यासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधील 25 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत असून, प्रत्येक केंद्रावर तीन सत्रांत परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 11, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत उमेदवार परीक्षेसाठी बसणार आहेत.
मुंबईत सेंटर्स कुठे ?
या परीक्षेसाठी मुंबईतील कांदिवली, शीव, पवई, तर नवी मुंबईतील खारघर येथे परीक्षा सेंटर आहे. तसेच पुण्यातील रामटेकडी, नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, जळगाव, अहिल्यानगरसह विविध शहरांत परीक्षा केंद्रे ठेवली आहेत.
प्रत्येक केंद्रावर समन्वयक अधिकारी व निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून एकूण 42 अधिकारी यासाठी काम पाहत आहेत. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड मुख्य समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतात.
उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेऊन सुरक्षेसह पारदर्शकतेसाठी काटेकोर तयारी करण्यात आली आहे.या परीक्षेच्या निकालानंतर पुढील टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडणार असून पालिकेत रोजगाराची सुवर्णसंधी मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे. या परीक्षेचा निकाल कधी लागतोय याकडेही सर्वांचे लक्ष असून उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
