
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सरकारी क्षेत्रात करिअरची पहिली पायरी चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची तेल आणि वायू कंपनी असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने ६०८ पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या (Graduate Apprentice) भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांसारख्या विविध शाखांमधील पदवीधरांना देशातील एका प्रतिष्ठित कंपनीत कामाचा अनुभव घेता येणार आहे.
HPCL ने एकूण ६०८ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E. किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार प्रामुख्याने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आणि इन्स्ट्रुमेंटेशन या शाखांमधील असावा. यात जनरल आणि OBC उमेदवारांना किमान ६० टक्के, तर SC/ST/PWD उमेदवारांना किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. केवळ १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर उत्तीर्ण झालेले उमेदवारच या भरतीसाठी पात्र ठरतील.
अर्जदाराचे वय किमान १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या इंजिनिअरिंगमधील गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा एकूण २५,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. यामध्ये HPCL कडून २०,५०० रुपये आणि भारत सरकारच्या DBT योजनेद्वारे ४,५०० रुपये दिले जातील.
१. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Apprentice 2026’ लिंकवर क्लिक करा.
२. ‘New Registration’ करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
३. लॉगिन केल्यानंतर आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
४. आपली अभियांत्रिकी शाखा आणि संबंधित राज्य निवडा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.