Abhishek Ghosalkar Murder | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, मेहुल पारेखचा ‘तो’ व्हिडीओ समोर, धक्कादायक माहिती उघड

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी आरोप केलेल्या मेहुल पारेखचा आणखी एक सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

Abhishek Ghosalkar Murder | अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, मेहुल पारेखचा तो व्हिडीओ समोर, धक्कादायक माहिती उघड
| Updated on: Mar 20, 2024 | 9:50 AM

मुंबई | 20 मार्च 2024 : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. ८ फेब्रुवारीला मॉरिस नरोना याने त्याच्याच कार्यालयात फेसबूक लाइव्ह सुरू असताना अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे एकच खळबळ माजली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण परसले होते. अबिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दीड महिन्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. अभिषेक यांच्या हत्येचा तपास नीट होत नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.

आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी आरोप केलेल्या मेहुल पारेखचा आणखी एक सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

काय आहे त्या व्हिडीओत ?

अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अनेक आरोप केले. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मॉरिस नरोना याचा तर मृत्यू झाला. पण त्याचा मित्र, मेहुल पारेख याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मेहुल पारेख याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याचंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सीसीटीव्हीच्या या फुटेजमध्ये मेहुल पारेख गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत दिसतोय. घोसाळकर यांच्या हत्येनंतरचा मेहुलची चौकशी सुरु असतानाचा हा व्हिडीओ आहे. मात्र तेव्हा मेहुल हा अधिकाऱ्यांसोबत असताना सिगारेट ओढत जाताना दिसतोय. त्यामुळे मेहुलला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोपी घोसाळकर कुटुंबियांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या तपासावरही घोसाळकर कुटुंबीयांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या ?

कालच्या पत्रकार परिषदेत दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी यांनीही अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. “८ फेब्रुवारीला माझ्या पतीची हत्या झाली. मात्र या हत्येचा योग्य तपास होत नाहीये. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांच्या वावराबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितलं होतं. ५ मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे आहेत. मॉरिस आणि मिश्रा याने सोबत बुलेट खरेदी केले, ती गन त्याची होती, मोरीसला त्याचा अॅक्सिस होता. आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत आणि तपासाची मागणी केलेली होती. सीसीटीव्ही दिले होते आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केलेली होती. मॉरिसला अमरेंद्र मिश्राने गन दिल्याचे स्पष्ट आहे. दोघांणी मिळून बुलेट खरेदी केल्या होत्या. अभिषेक आणि मॉरिस यांच्यात असणारे वाद मिश्राला माहिती होतं. त्या दिवशी अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावलं त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलेलं होतं. माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हायकोर्टाला एवढीच विनंती त्यांनी लवकर याचा निकाल लावावा”, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली.

तर हत्येचा तपास नीट होत नाही. मुख्यमंत्र्याना मूल जाण्याच दु:ख काय हे माहिती आहे. तसेच अभिषेक माझा मुलगा होता त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, असं आवाहन विनोद घोसाळकर यांनी केलं.