
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी गँगस्टर अबू सालेम “आंतरराष्ट्रीय गुन्हेगार” आहे. नोव्हेंबर महिन्यात अबू सालेमचा मोठा भाऊ अबू हकीम अन्सारीचे निधन झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अबू सालेमने कारागृहात अधिकाऱ्यांकडे १४ दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. मागणी फेटाळल्यानंतर सालेमने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. परंतु आता सालेमची पॅरोलवर सुटका झाली तर त्याला द्यावा लागणाऱ्या सुरक्षेच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. न्यायालयाने आपल्या भूमिकेवर ठाम राहात सुरक्षेचा सर्व खर्च सालेम यालाच करावा लागेल, असे सांगितले आहे.
14 दिवसांच्या पॅरोलची मागणी
गँगस्टर अबू सालेमला आपत्कालीन पॅरोलवर सोडवण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट पथकासाठी १७.६० लाख रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. शुल्क भरल्याशिवाय पॅरोल देता येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच चार दिवसांच्या पॅरोलसाठी २ जणांच्या पोलीस एस्कॉर्ट पथकासाठी १७.६० लाखांच शुल्क राज्य सरकारकडून आकारण्यात येणार आहे. ही रक्कम अवाजवी असून १ लाख रुपयांचे शुल्क भरण्याची तय्यारी असल्याचं सालमेच्या वकिलांनी म्हटले आहे. शुल्कात कोणतीही तडजोड करता येणार नसून रक्कम भरावीच लागेल असे न्यामूर्ती अजय गडकरी आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अबू सलीमला पॅरोल हवा असल्यास त्यालाच संपूर्ण खर्च करावा लागेल असे कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. अबु सालेम याच्या वकिलांनी मात्र आम्ही फक्त एक लाखापर्यंतचा खर्च करू शकतो, असे न्यायालयाला सांगितले आहे. मागच्या वेळेला जेव्हा पॅरोल दिला गेला तेव्हा फक्त दहा ते बारा सुरक्षारक्षक होते, असेही सालेमच्या वकिलाने म्हटले आहे. यावर न्यायालयाने सांगितलं की सुरक्षेचा विषय पोलीस ठरवतील तुम्ही ठरवू नका. नाशिक पोलिसांनी दिलेल्या पत्रात अबू सालेम याच्या चार दिवसांच्या संपूर्ण सुरक्षेचा खर्च 17 लाख 76 हजार इतका आहे. अबू सालेम पॅरोल घेऊन आपल्या मूळ गावी आजमगड येथे जाणार आहे. तो भाग थोडा संवेदनशील असल्याने पोलीस संरक्षण अत्यंत गरजेचं मानलं जातं.
या प्रकरणी परवा पुन्हा होणार सुनावणी
अबू सलेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराला उत्तर प्रदेशच्या आझमगढ या गावी उपस्थित राहण्यासाठी तसेच उर्वरित विधी करण्यासाठी सालेमने कारागृहात अधिकाऱ्यांकडे १४ दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. मागणी फेटाळल्यानंतर सालेमने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेत भावाचा अंत्यसंस्कार, ४० दिवसांचा भोग, कुराण ख्वानी आणि अन्य धार्मिक विधींना उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती