आधी पोलीस असल्याचे भासवून मैत्री केली, प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, मग महिलेसोबत…

पोलीस असल्याचे भासवत महिलेशी मैत्री केली, मग तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र त्यानंतर महिलेसोबत जे घडलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

आधी पोलीस असल्याचे भासवून मैत्री केली, प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, मग महिलेसोबत...
प्रेमाचे नाटक करुन महिलेवर अत्याचार
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jun 28, 2023 | 4:27 PM

कल्याण : प्रेम प्रकरणातून एक भयंकर घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. पोलीस असल्याचे भासवून एका 33 वर्षीय तरुणाने 40 वर्षीय महिलेशी मैत्री केली. मग तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या शारीरिक संबंधही ठेवले. मात्र यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने तिला नकार दिला. तरुणाने धोका दिल्याने महिलेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश कृष्णाबोध झा असे गुन्ह दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन 27 दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. तर आरोपीचा शोध सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

काय घडलं नेमकं?

पिडिता शहाड परिसरात राहत असून, फेब्रुवारी 2018 मध्ये तिची भावाच्या माध्यमातून आरोपीची ओळख झाली. आरोपीने आपण पोलीस असल्याचे पीडितेला भासवले. या ओळखीतून आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पीडितेला लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यादरम्यान आरोपीने महिलेकडून दोन महागडे मोबाईल आणि 60 हजार रुपये लुटले. महिला वारंवार लग्नाचा तगादा लावत होती, मात्र आरोपी टाळाटाळ करत होता.

अखेर पीडितेने तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेत सर्व हकीकत सांगितली. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी तू आमच्या जातीची नाही, त्यामुळे तुझ्याशी लग्न करणार नाही, असे सांगितले. पीडितेने पुन्हा आरोपीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचा नंबर ब्लॉक केला. अखेर महिलेने 1 जून 2023 रोजी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादवी कलम 376, 417, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.