आरोपी याकूब मेमन याच्यानंतर नागपूर जेलमध्ये कोणाला फाशी ? या आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, काय आहे प्रकरण
आरोपी वसंत दुपारे याच्या विरोधात नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक झाल्यानंतर तो नागपूर कारागृहात बंद आहे. काय आहे नेमके प्रकरण पाहूया..

मुंबई : नागपूर येथील सेंट्रल जेलमध्ये ( Nagpur Central Jail ) आता बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन नंतर दुसऱ्या एका आरोपीला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी एका चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निघृण खून करणाऱ्या नराधम आरोपी वसंत संपत दुपारे याची दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( president droupadi murmu ) यांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता याकूब मेमन याच्यानंतर नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी होणारा हा दुसरा आरोपी ठरला आहे.
सर्वौच्च न्यायालयाने 3 मे 2017 आरोपी वसंत दुपारे याची पुनर्विचार याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम केली होती. त्यामुळे आरोपीने राष्ट्रपतींकडे दयेकरीता अर्ज केला होता. ही घटना नागपूरच्या वाडी परिसरात घडली होती. शेजारी राहणाऱ्या एका चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमीष दाखवून घरापासून दूर घेऊन गेला. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार करीत अत्यंत निर्दयपणे तिचा खून केला होता. नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 23 फेब्रुवारी 2012 रोजी या अत्यंत धक्कादायक प्रकरणात आरोपी दुपारे याला मृत्यू दंडाची सजा सुनावली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण येताच उच्च न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2014 रोजी फाशीची शिक्षा कायम केली.
विकृत घटनांना अंकुश लावण्यासाठी फाशीच
आरोपी दुपारे याने सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. साल 2014 मध्ये न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने आरोपी दुपारे याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. या दरम्यान आरोपीने सर्वौच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल केली. न्या.दीपक मिश्रा, न्या.रोहिंग्टन फली नरीमन आणि न्या. उदय ललित यांच्या पूर्ण पीठाने साल 2017 साली अशा विकृत घटनांना अंकुश लावण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे सांगत शिक्षा कायम ठेवली.
राष्ट्रपती कार्यालयाच्या आदेश येताच..
आरोपी वसंत दुपारे याच्या विरोधात नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक झाल्यानंतर तो नागपूर कारागृहात बंद आहे. साल 2012 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला कारागृहाच्या फाशी यार्डात त्याची रवानगी करण्यात आली आहे. राष्ट्रपती सचिवालयातून त्याच्या फाशीचा आदेश प्राप्त होताच त्याला फाशी देण्यात येईल अशी फाशी सूत्रांनी दिली आहे.
