Atiq save UPA GOVT : बाहुबली अतिक अहमद याने 2008 मध्ये कसे वाचविले युपीए सरकार, अमेरिका अणूकरारावेळी संकटमोचक बनला माफीया
अतिक याच्यावर अपहरण, हत्या, खंडणी यासह एकूण शंभर गुन्हे दाखल आहेत.अतिक त्यावेळी गुन्हेगारीसह राजकारणातही आपली मजबूत पकड बनवून होता. त्यावेळी त्याने आपले मत युपीए सरकारच्या पारड्यात टाकले आणि सरकार कसे वाचविले...

Atiq save UPA GOVT : गुन्हेगारीतून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद याला पोलिसांच्या देखत शनिवारी प्रयागराज येथे ठार केले असले तरी त्याने साल 2008 मध्ये मनमोहन सिंह सरकार वाचविले होते. अमेरिकेबरोबर अणूकरारावेळी डाव्यांनी सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला त्यावेळी सरकार अल्पमतात येणार अशी धाकधूक होती. त्यावेळी तुरूंगात असलेल्या खासदार अतिक अहमद याच्यासह सहा खासदारांना देशातील विविध जेलमधून फर्लोवर 48 तासांत सोडण्यात आले होते असा खळबळजनक दावा ‘बाहुबलीज ऑफ इंडीयन पॉलिटीक्स : फ्रॉम बुलेट टू बुलेट’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
साल 2008 साली भारताचा अमेरिकेबरोबर अणूकरार होणार होता. या कराराला विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे युपीए सरकारवर संकट आले होते. डाव्यांनी अणूकराराला प्राणपणाने विरोध करीत मनमोहन सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी अतिक अहमद हा प्रयागराज येथील ( तेव्हा अहलाबाद ) फूलपूरमधून समाजवादी पार्टीचे खासदार होता.
48 तासांत कारागृहातून सुटका
मनमोहन सरकार वाचविण्यासाठी देशातील विविध कारागृहातून 48 तासांत अतिक अहमद याच्या सह सहा खासदारांची 48 तासांत सूत्रे फिरून फर्लोवर सुटका करण्यात आली होती असे ‘बाहुबलीज ऑफ इंडीयन पॉलिटीक्स : फ्रॉम बुलेट टू बुलेट’ या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकाचे लेखक राजेश सिंह असून रूपा पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात म्हटले आहे की ज्यांच्यामुळे युपीए सरकार अविश्वास ठराव जिंकले त्यापैकी अतिक अहमद एक होते. डाव्या सरकारने युपीए सरकारला बाहेरुन दिलेला पाठींबा काढल्याने युपीए संकटातून अतिक अहमद यांच्या व्होटमुळे वाचले असे जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मनमोहन यांना पूर्ण आत्मविश्वास होता
राजेश सिंह यांच्या पुस्तकात म्हटले आहे की लोकसभेत युपीए सरकारचे 228 सदस्य होते. अविश्वास ठरावातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी सरकारला 44 व्होट कमी पडत होते. परंतू पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पूर्ण आत्मविश्वास होता की आपले सरकार वाचणार. त्यांनी आपले सरकार भक्कम असल्याचे म्हटले होते. लवकरच ते स्पष्ट होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी म्हटले होते की लवकरच कळेल की विश्वास मतासाठी आवश्यक मते कुठुन येतील ते !
सहा जण फर्लोवर बाहेर आले
समाजवादी पार्टी अजित सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दल (RLD ) आणि एच.डी.देवेगौडा यांच्या जनता दल ( सेक्युलर ) यांनी युपीए सरकारला आपला पाठींबा दिला होता. सरकारला पाठींबा देणाऱ्या अन्य सदस्यांमध्ये अतिक अहमद ही होता. विरोधी पक्षाच्या अविश्वास ठरवाला उत्तर देण्यासाठी 48 तासांच्या आत त्याच्यासह सहा जणांना त्यांचे संविधानिक कर्तव्य बजावण्यासाठी फर्लोवर सोडण्यात आले होते.
