Bengaluru Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, एअरपोर्टवरच RCB च्या मोठ्या अधिकाऱ्याला अटक
Bengaluru Stampede : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर बुधवारी चेंगराचेंगरी झाली. यात 11 निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी थेट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मोठ्या अधिकाऱ्याला विमानतळावरच अटक केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विक्ट्री परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पहिली अटक झाली आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी सोहळा सुरु असताना बाहेर चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. बंगळुरुत 4 जून रोजी ही घटना घडली. या प्रकरणी आता पहिली अटक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पोलिसांना चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरलं होतं. पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे.अटक करण्यात आलेले मुंबईला पळण्याच्या तयारीत होते अशी माहिती आहे. जसे ते एअरपोर्टवर पोहोचले पोलिसांनी त्यांना अटक केली. निखिलची पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. बंगळुरमध्ये RCB च्या विजयानंतर विक्ट्री परेड दरम्यान झालेली चेंगराचेंगरी आणि अव्यवस्थेत त्याची भूमिका किती गंभीर होती, याची पोलीस चौकशी करत आहेत.
निखिलशिवाय पोलिसांनी या प्रकरणात आणखी तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची सुद्धा कसून चौकशी सुरु आहे. सध्या पोलीस हे जाणून घेत आहेत की, कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान कुठल्या-कुठल्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कोणाच्या अनुमतीने आयोजन करण्यात आलं होतं आणि सुरक्षा निकषांच पालन करण्यात आलं होतं का?. याला कोण जबाबदार आहे?. ही अटक या प्रकरणात मोठी कारवाई मानली जात आहे. यातून येणाऱ्या दिवसात अनेक खुलासे होऊ शकतात.
डीएनएच्या स्टाफला घेतलं ताब्यात
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. या प्रकरणी कब्बन पार्क पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स (इवेंटची आयोजन कंपनी), कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (KSCA) आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला होता. डीएनएचे तीन स्टाफ मेंबर्स किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यूला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीची जबाबदारी शेषाद्रिपुरमचे एसीपी प्रकाश यांच्याकडे आहे.
