
मुंबईतील सांताक्रूझमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 32 वर्षीय सीए राज मोरेने सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून स्वत:ला संपवले आहे. त्याने सांताक्रूझ पूर्व येथील राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केली. त्याने उचललेल्य या टोकाच्या पाऊलाने सर्वांना धक्काच बसला आहे.

राज मोरे प्रकरणी वाकोला पोलीस चौकशी करत आहेत. त्यांनी 26 वर्षीय मॉडेस राहुल परवानी आणि त्याची मैत्रिण सबा कुरेशी यांना अंधरी येथील लोखंडवाला परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्या दोघांनी राजला सतत धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

राहुल आणि राज हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. सप्टेंबर 2024मध्ये ते दोघे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले होते. राहुलने शारीरिक संबंधाचे अनेक व्हिडीओ शूट केले होते.

राज मोरेला सतत राहुल धमकावत होता. समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी तो राजला द्यायचा. राहुल आणि त्याची सहकारी सबा कुरेशीने राज कडून जवळपास 2 कोटी 47 लाख रुपये उकळले होते. पण अखेर राजला हे सगळ सहन झाले नाही. त्याने स्वत:ला संपवले. पण त्याने आईसाठी एक चिठ्ठी लिहिली.

राहुलने राजच्या नावावर एक एसयूव्ही कार घेतली होती. त्या कारचे हप्ते राजच भरायचा. राहुलने पोलिसांसमोर कबुली दिली की त्याने राज कडून उकळलेले पैसे शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतवले होते.

राज हा काही दिवसांपूर्वीच कर्करोगावर मात करुन आला होता. तसेच त्याने या कठीण परिस्थितीमध्ये सीएची परिक्षा देखील पास केली होती. मात्र, आता मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे त्याने आईला पत्र लिहित टोकाचे पाऊल उचलले.

"प्रिय आई, मला माफ कर, मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही. मी तुला एकटं सोडून जातोय. देव तुला पुढल्या जन्मी माझ्यासारखा मुलगा न देवो. मी खूप वाईट वागलो आहे, पूनम मावशी माझ्या आईची काळजी घे. माझ्या वेगवेगळ्या अकाऊण्टमध्ये काही पैसे आहेत, ते घेऊन माझ्या आईला द्या. माफ करा" असे त्याने शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिले.