कुटुंब आनंदात निघालेलं, हायवेवर अचानक कारमध्ये गोळी घुसली, दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

| Updated on: Nov 08, 2021 | 9:59 AM

पीडित कुटुंब महामार्गावर पांढऱ्या लेक्सस गाडीने प्रवास करत होते, तेव्हा त्यांच्या कारवर अचानक गोळी धडकली. ही गोळी बालकाच्या थेट डोक्यात घुसली. त्याला लहान मुलांच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

कुटुंब आनंदात निघालेलं, हायवेवर अचानक कारमध्ये गोळी घुसली, दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कॅलिफोर्निया : अमेरिकेत शनिवारी आंतरराज्य महामार्गावर झालेल्या गोळीबारात 23 महिन्यांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. संबंधित कुटुंब आपल्या कारने प्रवास करत असताना अचानक गोळी गाडीवर धडकली. डोक्यात गोळी लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यूएसएमधील कॅलिफोर्नियातील ओकलंड शहरात स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

पीडित कुटुंब हे फिल्बर्ट स्ट्रीटजवळ दक्षिणेकडे जाणाऱ्या I-880 महामार्गावर पांढऱ्या लेक्सस गाडीने प्रवास करत होते, तेव्हा त्यांच्या कारवर अचानक गोळी धडकली. ही गोळी बालकाच्या थेट डोक्यात घुसली. त्याला बेनिऑफ या लहान मुलांच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

गाडीतील इतरांना दुखापत नाही

23 महिन्यांचा जॅस्पर वू (Jasper Wu) गाडीत मागच्या बाजूला कार सीटमध्ये बसला होता. त्यावेळी बुलेट कारची काच भेदून त्याच्या डोक्याला लागली. त्याची आई कार ड्राईव्ह करत होती. गाडीत असलेले इतर दोन वयस्क आणि दोन लहान मुलं यांना मात्र कुठलीही दुखापत झाली नाही. जॅस्पर आपला दुसरा वाढदिवस साजरा करण्याआधीच जगाचा निरोप घेऊन गेला. त्यामुळे कुटुंबाच्या मित्र परिवाराकडून शोक व्यक्त केला जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

गोळी कुठून आली, हे अस्पष्टच

प्राथमिक तपासानुसार या गाडीवर जाणुनूबुजून हल्ला झाला नसून अंदाधुंद गोळीबार किंवा अनवधानाने ही गोळी लागल्याचा दावा केला जात आहे. या प्रकाराविषयी कोणाला माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन केलं जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींना पकडण्याचं आव्हान आहे.

संबंधित बातम्या :

श्रीनगरमध्ये 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर