
Gauri Garge Death Case : मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. गौरी पालवे गर्जे असे अनंत गर्जे यांच्या पत्नीचे नाव होते. या आत्महत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकारांनी गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना या प्रकरणी अद्याप माझ्याकडे पूर्ण ब्रिफिंग आलेले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच मला फक्त प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे ब्रिफिंग गेल्यावरच मला याबाबतीत बोलता येईल, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी गर्जे यांचा पती अनंत गर्जे, नणंत शीतल गर्जे, दीर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गौरी गर्जे या एक डॉक्टर होत्या. दुपारी एक वाजता आपली नोकरी करून त्या घरी परतल्या होत्या. त्यानंतर अनंत गर्जे यांच्या कथित अनैतिक संबंधाची माहिती गौरी पालवे गर्जे यांना समजली. त्यानंतर गौरी पालवे गर्जे आणि अनंत गर्जे यांच्यात वाद चालू होते, असे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी गौरी पालवे गर्जे यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी पालवे गर्जे यांचे शवविच्छेदन करताना ती सर्व प्रक्रिया रेकॉर्ड केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.