5 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा उपअधीक्षक चतुर्भुज; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

येवला येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या.

5 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा उपअधीक्षक चतुर्भुज; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
संग्रहित छायाचित्र.


येवलाः येवला येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला 5 हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

स्थळ पंचनाम्यासाठी लाच

येवला येथील भूमी अभिलेख कार्यालयात एस. एम. शेख हा उपअधीक्षक म्हणून काम करतो. त्याने स्थळ पंचनामा करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे 10 हजारांची मागणी केली होती. या लाचेतील 5 हजारांची रक्कम तो एजंटामार्फत स्वीकारणार होता. मात्र, संबंधित व्यक्तीला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी संबंधिताला बोलावण्यात आले. मात्र, उपअधीक्षक शेख याने आपल्या एजंटला पाठवले. पाच हजारांची लाच घेताना या एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या. लाचप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, भूमी अभिलेख कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता आहे.

‘त्या’ घटनेची अजूनही चर्चा

नाशिकमध्ये निवृत्त सहकाऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. त्या कारवाईची अजूनही चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयात हा प्रकार घडला होता. दहा हजारांची लाच घेताना आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. मुख्य लिपीक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपीक लता शांताराम लहाने (बोडके) यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या महाबहाद्दरांनी आपल्याच कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी केली होती.

सामान्यांमध्ये आनंद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज येवल्यामध्ये कारवाई केल्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये मात्र आनंद दिसला. येथे त्यांना अनेकदा त्यांच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आली. कित्येकांनी गरज पाहून हा पैसाही दिला. मात्र, त्यांच्यातल्याच एकाने हिम्मत करून तक्रार दिली. त्यामुळे या कारवाईचे कौतुक होत आहे.

इतर बातम्याः

Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!

विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे नाशिकमध्ये अनावरण; भुजबळ नॉलेज सिटीमध्येही तयारी जोरात!

राज्य सरकारनं बहुजनांना अंधारात लोटलं, OBC आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं ढोंग, पंकजांचा घणाघात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI