बायकोवर विवाहबाह्य संबंधांचा संशय, नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकलं

| Updated on: Sep 19, 2021 | 11:19 AM

आरोपी सिद्दप्पाने आपण या मुलाचे पिता असल्याचा इन्कार केला होता. पत्नी राजश्रीवर तो विवाहबाह्य संबंधांचा संशय घेत होता. याच रागातून त्याने चिमुकल्याची हत्या केली असावी, असा आरोप राजश्रीच्या आईने केला आहे

बायकोवर विवाहबाह्य संबंधांचा संशय, नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकलं
आरोपी बाप सिद्धप्पा
Follow us on

बेळगाव : बोअरवेलमध्ये अडीच वर्षांचा चिमुकला मृतावस्थेत सापडल्याने बेळगावात एकच खळबळ उडाली होती. मात्र चिमुकल्याच्या आईच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर त्याचा पिताच या प्रकरणातील प्रमुख संशयित ठरला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बापाने आपल्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलकनूर गावात शनिवारी हा प्रकार घडला होता. अडीच वर्षांचा चिमुकला शुक्रवारी खेळताना बेपत्ता झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका बोअरवेलमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता.

नेमकं काय घडलं?

आरोपी सिद्दप्पाने आपण या मुलाचे पिता असल्याचा इन्कार केला होता. पत्नी राजश्रीवर तो विवाहबाह्य संबंधांचा संशय घेत होता. याच रागातून त्याने चिमुकल्याची हत्या केली असावी, असा आरोप राजश्रीच्या आईने केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सिद्दप्पाने कबुली दिली की आपणच बालकाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह बोअरवेलमध्ये टाकला.

घरापासून 100 मीटर अंतरावरील बोअरवेलमध्ये मृतदेह

ऊसाच्या पिकांमध्ये असलेली बोअरवेल सिद्दप्पाच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. चिमुकल्याचे अपहरण केल्याबद्दल विचारले असता सिद्दप्पा स्वतः पोलिसांना बोअरवेलकडे घेऊन गेला होता. पोलिसांनी सांगितले की ते जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांसह सर्व बाजूंचा तपास करत आहेत.

लातूरमध्ये बापाकडून मुलीची हत्या

दुसरीकडे, दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीची वडिलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी लातूरमध्ये उघडकीस आला होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने मुलीला मारहाण केली. त्यानंतर पाण्याच्या हौदात फेकून पित्याने पोटच्या पोरीचा जीव घेतला होता. लातूर जिल्ह्यातील आशीवमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. पाण्यात बुडून चिमुकलीचा करुण अंत झाला. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली होती.

नेमकं काय घडलं होतं?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पिता संतोष भोंडे हा घरात पत्नी-मुलांना नेहमीच मारहाण करायचा. पत्नी आणि आई-वडील शेतावर गेल्यानंतर घरात मुले खेळत असताना आरोपीने दीड वर्षांच्या चिमुकलीला मारहाण केली आणि हौदात फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. घरी परतल्यावर मुलांनी आई आणि आजी-आजोबांना ही घटना सांगितली.

कोरोना संसर्गाने मृत्यूचा बनाव

दुसरीकडे, मनाविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरुन आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात समोर आली होती. तरुणीने मे महिन्यात लग्न केलं होतं, मात्र काही दिवसांनी माहेरी आल्यानंतर तिचा गूढ मृत्यू झाला. पोटदुखीमुळे मुलीची प्रकृती बिघडली, तिला कोरोना संसर्ग झाला आणि तिचा मृत्यू झाला, असं तिच्या आई-वडिलांनी नवऱ्याला खोटं कळवलं. अखेर पालकांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलं.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन