बॅचलर मुलीच्या फ्लॅटमध्ये भयानक घडलं, तुमच्याबाबतही असं घडू शकतं; फ्लॅट, स्पाय कॅमेरा आणि…

| Updated on: May 01, 2023 | 9:18 AM

तुम्हीही भाड्याच्या घरात राहत असाल तर आधी संपूर्ण घर चेक करून घ्या. तुमच्या घरात स्पाय कॅमेरे तर लावले नाहीत ना? याची खात्री करून घ्या. कारण राजस्थानमध्ये असंच एक प्रकरण उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

बॅचलर मुलीच्या फ्लॅटमध्ये भयानक घडलं, तुमच्याबाबतही असं घडू शकतं; फ्लॅट, स्पाय कॅमेरा आणि...
man arrested
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उदयपूर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून तरुणींचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरे फिट करण्याचं काम करतो. तसेच संगणकाचेही काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि इतर सामान जप्त केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

एका तरुणीने उदयपूरच्या प्रातपनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या तरुणीने बोहरा गणेशजी मंदिर रोडवरील पार्थ कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता. राज सोनी याच्याकडून हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. राज सोनी हा चितौडगडचा रहिवासी आहे. सध्या तो वर्धमान कॉम्प्लेक्स येथे राहतो. काही दिवसानंतर फ्लॅटची डागडुजी करायची असं सांगून हा तरुण फ्लॅटमध्ये आला होता.

हे सुद्धा वाचा

घरातील दुरुस्तीचं काम आहे असं सांगून तो आला आणि त्याने संपूर्ण फ्लॅटमध्ये स्पाय कॅमेरे बसवले. त्याने स्पाय कॅमेरे बसवल्याची या तरुणीला थोडीही कल्पना नव्हती. मात्र, एक दिवस अचानक तिची नजर या स्पाय कॅमेऱ्यावर गेली अन् तिच्या पायाखालची वाळूच सरकली. या तरुणीने या घटनेची माहिती तात्काळ तिच्या कुटुंबीयांना दिली.

ऑनलाइन पाहायचा

तरुणीच्या तक्रारीनुसार, राज सोनीने फ्लॅटमधील इंटरनेट राऊटरद्वारे त्याच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचा अॅक्सेस घेतला होता. दिवसभरातील फ्लॅटमधील घडामोडी तो आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पाहायचा. त्याने हिडन कॅमेऱ्याने अनेक अश्लील व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते.

आरोपीला अटक

या पीडित तरुणीच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज हा संगणकाचे काम करतो. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचेही काम करतो. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.