
अलिगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मुलीच्या लग्नाला अवघे 9 दिवस बाकी असताना सासूच आपल्या होणाऱ्या जावयाबरोबर पळून गेली होती. दोन्ही कुटुंबाकडून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत सासू आणि जावयाचा शोध सुरू केला. ज्या दिवशी लग्न होणार होतं, त्याच दिवशी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीमध्ये दोघांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
या प्रकरणातील महिला अनीता उर्फ अपना देवीला वन स्टॉप पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. तर तिचा होणारा जावई राहुल याला मडराक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून दोघांची वेगवेगळी चौकशी सुरू आहे. मात्र दोघांचं एकच उत्तर आहे, आम्ही एकमेकांवर प्रेम केलं. आम्हाला लग्न करायचं आहे, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. आमचं प्रेम आहे, आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, आम्हाला लग्न करायचं आहे. असं या प्रकरणातील महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे. विशेष म्हणजे या महिलेची भविष्यातील प्लॅनिग ऐकून पोलिसांना देखील प्रचंड धक्का बसला आहे.
महिलेनं सांगितला पुढचा प्लॅन
मला आता माझ्या पतीकडे जायचं नाहीये, मी त्याला कंटाळूनच राहुलसोबत पळून गेले होते. मी आता राहुललाच माझा पती मानते. आता मी त्याच्यासोबतच लग्न करून माझं पुढचं आयुष्य घालवणार आहे. जेव्हा तिला पोलिसांनी सांगितलं की जर तुझ्या नवऱ्यानं तुला घटस्फोट दिला नाही तर तुझं लग्न राहुल सोबत कसं होऊ शकतं? त्यावर उत्तर देताना तीने म्हटलं की, माझा घटस्फोट झाला काय किंवा नाही झाला काय, मला काही फरक पडत नाही. मी राहुलसोबतच राहणार आहे. आम्ही सगळी प्लॅनिंग आधीपासूनच बनवली आहे. आम्ही जिथे पण राहु तिथे आनंदात राहू.राहुल देखील आपल्या सासूसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. आम्ही एकमेकांसोबत आनंदी असल्याचं राहुलने म्हटलं आहे.