डॉक्टरने स्वत:ला विषारी इंजेक्शन देऊन संपवले जीवन?, तीन दिवस कारमध्येच होता मृतदेह
या तरुण डॉक्टरची कार गेल्या तीन दिवसांपासून कोडईकनाल येथील पुंपराईजवळील जंगलात उभी होती. स्थानिक लोकांनी या संदर्भात पोलिसांना तक्रार केली, त्यानंतर पोलीसांनी तपास केला...

तमिलनाडु येथील एका युवा डॉक्टरने स्वत:ला इंजेक्शनमधून एक तरल पदार्थ टोचून जीवनाचा अंत केल्याचे उघडकीस आले आहे. कोडाईकनाल जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे असा संशय घेतला जातोय की या डॉक्टरने स्वत:ला कुठलातरी विषारी तरल द्रव्य टोचून ही आत्महत्या केली आहे. दुर्देव म्हणजे या डॉक्टरचा मृतदेह कारमध्येच तीन दिवस पडून होता तरीही कोणाला काही कळाले नाही. या डॉक्टरच्याजवळ पोलिसांना आयव्ही फ्लुडची बॉटल सापडली आहे.
कोडाईकनाल येथे एका कारमध्ये डॉक्टर जोशुआ सम्राज याचा मृतदेह सापडला आहे. जोशुआ हे तामिळनाडूच्या सेलम येथे एमडीचे शिक्षण घेत होते. त्याने कर्जात बुडाल्याने ही आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. डॉ. जोशुआ सम्राज मदुरई येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होते. जोशुआ यांची कार गेल्या तीन दिवसांपासून कोडईकनाल येथील पुंपराईजवळील जंगलात उभी होती. स्थानिक लोकांनी या संदर्भात पोलिसांना तक्रार केली, त्यानंतर पोलीसांनी तपास केला तर त्याच्या कारमध्ये एक सुसाईड नोट सापडली होती.
सुसाईड नोटमध्ये कुटुंबाची माफी मागितली
सुसाईड नोटमध्ये डॉ. जोशुआ सम्राज याने या उचलेल्या पावलांबद्दल कुटुंबाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या या पावलांबद्दल कोणासही जबाबदार धरु नये असे म्हटले आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केलेला नाही. पोलिसांनी केलेल्या तपासाता आढळले की जोशुआ याला कर्ज झाले होते. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असावे असे म्हटले जात आहे. त्याने ऑनलाईन गेममध्ये पैसे लावले असे म्हटले जात आहे.
पोलीस करत आहेत चौकशी
मृतदेहाजवळ सापडलेल्या नोटमध्ये या डॉक्टरने कोणतेही कारण दिलेले नसल्याने पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक तपासातून असे स्पष्ट झाले आहे की त्याने स्वत:ला एखादा तरल पदार्थ टोचून आत्महत्या केली असावी असे म्हटले जात आहे. मृत्यूचे खरे कारण आता पोस्ट मार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल असे म्हटले जात आहे.
