पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे… सततचं आजारपण सहन झालं नाही; ‘त्या’ घटनेने नाशकात खळबळ
नाशिकच्या जेलरोड परिसरामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून लोकं हादरले आहेत. निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पत्नीला मारल्यानंतर स्वतःचही आयुष्य संपवलं.

पत्नीला असलेल्या दीर्घ आजारपणाला कंटाळून नाशिकमध्ये एका निवृत्त मुख्याध्यापकाने भयानक पाऊल उचललं. त्यांनी आधी आयुष्याच्या जोडीदाराची हत्या केली आणि नंतर टोकाचं पाऊल उचलत स्वत:चा जीवही घेतला. नाशिकच्या जेलरोड परिसरामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून लोकं हादरले आहेत. निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पत्नीला मारल्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर जोशी (78) आणि लता जोशी असं मृत दांपत्याचं नाव असून ते दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची दोन्ही मुलं ही मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. तर नाशिकमधील जेलरोड परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये जोशी दांपत्य, दोघेच रहायचे. 2017 सालापासून लता जोशी यांना मेंदू विकाराचा त्रास होता, एकदा त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. मात्र या दीर्घ आजारपणामुळेच जोशी दांपत्य कंटाळलं होतं, त्यामुळेच त्यांनी आयुष्य संपवण्याचं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत धक्कादायक सत्य उघड
पत्नीच्या मृत्यूनंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांचही आयुष्य संपवलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे” असा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी केला होता. तसेच “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही” असंही त्यांनी स्पष्टपणे लिहीलं होतं. या धक्कदायक प्रकरणामुळे परिसरात शोककळा पसरली असून दोघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पुण्यात महिलेने घेतला जुळ्या मुलांचा जीव
तर पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका महिलेने तिच्या पोटच्या दोन चिमुकल्या, जुळ्या बाळांचा जीव घेतला. लग्नाच्या 10 वर्षांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून तिला ही मुलं झाली होती, मात्र त्या महिलेने त्याच बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवलं आणि जीव घेतला.
टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून ही मुलं झाली होती, पण त्यांची वाढ नीट होत नव्हती आणि त्यांच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने त्या मातेने हे क्रूर पाऊल उचलले. एवढेच नव्हे तर त्या चिमुकल्या मुलांना पाण्यात बुडवल्यानंतर त्या महिलेने स्वत:देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
