बांधकाम विभागाचा अभियंता अडकला एनसीबीच्या जाळ्यात, पार्सलमध्ये काय होते?

नागालँडहून आलेल्या पार्सलची दिल्लीत तपासणी झाली. मग संबंधित पार्सल स्वीकारणाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता पार्सलचे धागेदोरे चंद्रपूरपर्यंत निघाले.

बांधकाम विभागाचा अभियंता अडकला एनसीबीच्या जाळ्यात, पार्सलमध्ये काय होते?
चंद्रपूरमध्ये ड्रग्ज पार्सल घेताना अभियंत्याला अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 25, 2023 | 10:12 AM

चंद्रपूर : पोंभुर्णा येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज पार्सल घेताना अभियंत्याला रंगेहाथ अटक केली आहे. हेमंत बिचवे असे 29 वर्षीय अटक अभियंत्याचे नाव आहे. अभियंत्याला 2.24 ग्रॅम एलसीडी ड्रग्ज स्वीकारताना पकडले. अटक अभियंत्याला पोंभुर्णा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ट्रांसिट डिमांड देण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी आरोपीला एनसीबीने दिल्लीत नेले. अटक अभियंता पोंभुर्णा येथील पीडब्लूडीच्या उपविभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होता.

‘असा’ अडकला जाळ्यात

नागालँडहून दिल्लीत एक पार्सल आले होते. दिल्ली पोलिसांना या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. पोलिसांनी या पार्सलची पाहणी केली असता यात ड्रग्ज आढळून आले. यानंतर पोलिसांनी पार्सल घेणाऱ्या संबंधित व्यक्तींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीपासून चंद्रपूरपर्यंत निष्पन्न झाले. हे ड्रग्ज कुठे कुठे पाठवण्यात येणार होते याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

अभियंत्याच्या घरीही छापेमारी

यानंतर दिल्ली पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना संपर्क साधून सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार चंद्रपूर एनसीबी पथकाने सापळा रचून ड्रग्जचे पार्सल घेताना अभियंत्याला अटक केली. हे ड्र्ग्ज पोस्टाद्वारे चंद्रपूरला पोहचवण्यात आले होते. पोलिसांनी बिचवे याला अटक करत त्याच्या घरीही छापेमारी केली. छाप्यात त्याच्या घरी 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एलएसडी ड्रग्जचे 24 पोस्ट कार्डची तिकिटं आढळून आली. या एका पोस्टकार्ड तिकिटाची किंमत 3 हजार रुपये आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.