VIDEO: काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डॉक्टरवर हल्ला, मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 13, 2021 | 4:15 AM

गडचिरोलीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने कोरोना नियंत्रणासाठी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांना घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केलाय.

VIDEO: काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डॉक्टरवर हल्ला, मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल
Follow us on

गडचिरोली : एकिकडे कोरोनाने थैमान घातलंय. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. अशास्थिती डॉक्टर्सची संख्या कमी पडतेय. मात्र, दुसरीकडे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने थेट गडचिरोलीत नियुक्ती घेऊन रुग्णसेवा करणाऱ्या तरुण डॉक्टरवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आरमोरीमध्ये घडलीय. काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने कोरोना नियंत्रणासाठी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांना घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केला आणि मारहाण केली. यामुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटलीय. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरातून या घटनेचा निषेध होतोय. तसेच आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे (Ex Congress MLA son Attack on doctor doing covid work in Armori Gadchiroli).

नेमकं काय घडलं?

डॉ. अभिजीत मारबाते हे आदिवासी भागात वंचित नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र रुग्णेसवा करत आहेत. 12 मे 2021 रोजी देखील ते नियमितपणे आपलं काम करत होते. यावेळी सायंकाळी पावणेसात वाजता माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा आला आणि त्याने आपल्या घरी होम क्वारंटाईन असलेल्या नातेवाईकंसाठी गोळ्या मागितल्या. डॉक्टर मारबाते यांनी आपल्या वैद्यकीय नियमांनुसार नातेवाईकांना सर्दी, खोकला, ताप अशी काही लक्षणं असल्याचं विचारलं. मात्र, आरोपी लॉरेन्स गेडामने नातेवाईकांना काहीही लक्षणं नसल्याचं सांगितलं. यानुसार डॉक्टरांनी आरोपीला गोळ्या दिल्या.

शिवीगाळ करत नोडल अधिकाऱ्यांना मारहाण, आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी

औषधे घेतल्यावर आरोपी गेडामने ते पाहिली आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत ते औषधं टेबलवर फेकले. तसेच औषधं देण्याची तुझी लायकी आहे का असं म्हणत घाणेरडी शिवीगाळ करत हल्ला केला. यावेळी आरोपी गेडामने आरमोरी उपकेंद्राचे नोडल अधिकारी असलेल्या मारबाते यांना मारहाण केली. विशेष म्हणजे सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोरच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानं त्यांचं मनोधैर्य खचलंय. कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालत काम करुनही हल्ला झाल्यानं वैद्यकीय कर्मचारी आक्रमक आहेत. गावकऱ्यांनी देखील आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय.

जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशीच वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला

12 मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन. हा दिवस जगभरात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत साजरा केला जातो. मात्र, गडचिरोलीतील आरमोरी येथे काँग्रेसचे माजी आमदार आनंदाराव गेडाम यांच्या मुजोर मुलाने याच दिवशी प्राथमिक उपकेंद्राचे नोडल अधिकारी डॉ. मारबाते यांच्यावर हल्ला केला. यामुळे डॉक्टर संघटनेने घटनेचा निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तसेच आरोपीवर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचाही इशारा डॉक्टर मेघा सौवसागडे यांनी दिलाय.

अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. डॉक्टर संघटनांनी आरमोरी येथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी केलीय. या प्रकरणी पीडित डॉ. सचिन मारबते यांनी मावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आरोपीचा पहिलाच गुन्हा नाही, अपहरणाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर

दरम्यान, काँग्रेसचे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम याचा हा काही पहिलाच गुन्हा नाही. त्याच्यावर याआधी निवडणुकीदरम्यान विरोधी उमेदवार बग्गु ताडाम यांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांना पूर्ण निवडणूक प्रचार होईपर्यंत मुलासह फरार राहावं लागलं. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारल्याने त्यांना कोर्टात हजर राहावे लागले. सध्या तो जामिनावर बाहेर होता. असं असतानाही आरोपीने पुन्हा डॉक्टरांवर हल्ला केला आहे.

हेही वाचा :

कर्तव्यासाठी काहीही, बालाघाटच्या महिला डॉक्टरचा भर उन्हात 7 तास प्रवास, नागपूरला पोहचून लगेच रुग्णसेवा

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला, डाव फसल्यानं मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?

हत्या, चकमक, जाळपोळीचे आरोप; 16 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी पोलिसांच्या कचाट्यात

व्हिडीओ पाहा :

Ex Congress MLA son Attack on doctor doing covid work in Armori Gadchiroli