हत्या, चकमक, जाळपोळीचे आरोप; 16 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी पोलिसांच्या कचाट्यात

खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (gadchiroli police naxal kishor kavdo)

  • इरफान मोहम्मद, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली
  • Published On - 0:04 AM, 12 Apr 2021
हत्या, चकमक, जाळपोळीचे आरोप; 16 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी पोलिसांच्या कचाट्यात
गडचिरोली पोलीस अधिक्षक कार्यालय

गडचिरोली : खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. पकडण्यात आलेल्या या नक्षलवाद्याचे नाव किशोर कावडो असे आहे. (naxal Kishor Kavdo nabbed by Gadchiroli police and hospitalized)

नक्षलवाद्याची जखमी अवस्थेत वणवण भटकंती

मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते. या चकमकीत किशोर कावडो नावाचा नक्षलवादी जखमी झाला होता. या नक्षलवाद्याविरोधात खून, चकमक, जाळपोळे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याला पकडण्यासाठी तब्बल 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील आठवड्यात झालेल्या चकमकीत जखमी झाल्यामुळे त्याला सोडून इतर नक्षलवाद्यांनी नंतर पळ काढला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी हा नक्षलवादी भटकत होता. याची गुप्त माहिती मिळताच कटेजरी गावातून नक्षल समर्थक असलेल्या एका नक्षलवाद्याच्या घरातून या जहाल नक्षलवाद्यांला अटक करण्यात आलीये.

नक्षलवाद्याच्या पायाला गँगरीन

चकमकीत गंभीर जखमी झाल्यांमुळे या नक्षलवाद्याच्या पायाला गँगरीन झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचे ठरवले. त्याच्यावर गडचिरोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. पायाला गोळी लागल्यामुळे त्याच्या पायाला गँगरीन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याच्यावर इतर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, तब्बल 16 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात यश आल्यामुळे गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे सांगितले जात आहे. या नक्षलवाद्याकडून नक्षली चळवळीचे काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  573 नवे रुग्ण

Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

(naxal Kishor Kavdo nabbed by Gadchiroli police and hospitalized)