पेशाने इंजिनियर, हायप्रोफाईल सोसायटीत वास्तव्य; ‘या’ कारणामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सुनील जाधव

सुनील जाधव | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Sep 15, 2022 | 9:18 PM

या बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सिम कार्ड मिळवायचे. त्यानंतर त्या सिमकार्डच्या सहाय्याने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्या वस्तू मागवायचे.

पेशाने इंजिनियर, हायप्रोफाईल सोसायटीत वास्तव्य; 'या' कारणामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
अमेझॉन, फ्लीपकार्टची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
Image Credit source: TV9

डोंबिवली : झटपट पैसा कमवण्याच्या नादात सुशिक्षित तरुणही गैरमार्गाला लागले आहेत. फसवणूक करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही तरुण आपल्या शिक्षणाचा चोरी करण्यासाठी कसा उपयोग करतात ते अनेकदा समोर आलंय. असाच काहीसा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या कंपन्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष बाब म्हणजे यात एका उच्च शिक्षित इंजिनियर (Engineer)चा देखील समावेश आहे. इंजिनियरसह त्याच्या 4 साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट आधारकार्डच्या आधारे सिम कार्ड घ्यायचे

ही टोळी सोशल साईटवरून आधारकार्ड डाउनलोड करून त्याच्यावर आपला फोटो लावून हुबेहूब आधार कार्ड बनवायची. या बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सिम कार्ड मिळवायचे. त्यानंतर त्या सिमकार्डच्या सहाय्याने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्या वस्तू मागवायचे.

देशातील अनेक राज्यांत या टोळीने गंडा घातला

मागविलेल्या वस्तू आणणाऱ्या पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमधून वस्तू काढून घेत त्यात त्याच वजनाची साबण टाकून परत करायचे. काही मिनटात ते काम करत होते. या पाच जणांच्या टोळी देशभरातील अनेक राज्यात या दोन कंपन्यांना गंडा घातला आहे.

गुन्ह्याचा मास्टरमाईंड पेशाने इंजिनियर

रॉबिन आरुजा, किरण बनसोडे, रॉकी कर्न, नवीन सिंग, आलोक यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रॉबिन हा इंजिनियर असून डोंबिवलीतील पलावा या हायप्रोफाईल सोसायटीत राहतो.

झटपट पैसा कमवण्यासाठी त्याने हा प्लॅन केला आणि या चार जणांची निवड केली. बनावट आधारकार्ड तयार करून आधी सिम कार्ड मिळवायचे. या सिम कार्डचा आधारे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपनीकडून मोबाईल व इतर महागड्या वस्तू ऑर्डर करायचे.

बहाणा करुन डिलिव्हरी बॉयकडून बॉक्स काढून घ्यायचे

ऑर्डर केलेल्या वस्तू घेऊन डिलिव्हरी बॉय आल्यानंतर त्याच्याकडून काही ना काही बहाणा करून तो बॉक्स घ्यायचे. त्याची नजर चुकवून अवघ्या काही क्षणात बॉक्स कटरच्या साह्याने कापून त्यातील वस्तू काढून त्याऐवजी त्याच वजनाच्या दुसऱ्या वस्तू ठेवायचे.

पैसे कमी असल्याचा बहाणा करत तो बॉक्स पुन्हा कंपनीला पाठवून द्यायचे. त्यानंतर या वस्तू बाजारात कमी किमतीत विक्री करत होते. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली होती.

आरोपींकडून पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून 22 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक टॅब, वीस सिम कार्ड, 29 बनावट आधारकार्ड असा पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाच जणांनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग या शहरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे .

यापूर्वी देखील त्यांना कराड, अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI