सकाळचा चहा उशीरा देणे ‘सुंदरी’ला पडले भारी, संतप्त पतीने तलवारीने केला वार
बहुतांश लोकांना सकाळी उठल्यावर चहा प्यायची सवय असते. पण सकाळच्या चहामुळे कुणाचं भांडण झाल्याचं तुम्ही ऐकले आहे का ? गाझियाबादमध्ये एका चहाच्या कपावरून झालेल्या भांडणाचा अतिशय हिंसक शेवट झाला. सकाळी उठल्यावर चहा द्यायला उशीर झाला म्हणून पतीने तलवार काढून..

गाझियाबाद | 19 डिसेंबर 2023 : बहुतांश लोकांना सकाळी उठल्यावर चहा प्यायची सवय असते. त्याने मन तर फ्रेश होतंच पण उत्साह देखील वाटतो. पण सकाळच्या चहामुळे कुणाचं भांडण झाल्याचं तुम्ही ऐकले आहे का ? गाझियाबादमध्ये एका चहाच्या कपावरून झालेल्या भांडणाचा अतिशय हिंसक आणि दु:खद शेवट झाला. सकाळी उठल्यावर पतीने चहा मागितला, पण तो द्यायला पत्नीला थोडा उशीर झाला. बास.. एवढ्याशा छोट्या कारणामुळे तो संतापला आणि त्याने पत्नीवर थेट तलवारीने जीवघेणा वार करत तिची हत्या केली. मंगळवारी सकाळी गाझियाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेबद्दल कळल्यानंतर पोलिसांनी तताडीने घटनास्थळ गाठले, पण तोपर्यंत आरोपी पती तेथून फरार झाला. त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके पाठवण्यात आली असून अधिक तपासही करण्यात येत आहे.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हे प्रकरण गाझियाबद जवळच्या भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाजलगड गावातील आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गावातील लोकांना लहान मुलांच्या जोरजोरात किंकाळ्या ऐकू आल्या. तोपर्यंत त्यांचे डोळेही नीट उघडले नव्हते, मात्र आवाज ऐकून त्यांनी तिच्या घराजवळ धाव घेतली. तेव्हा त्यांना समजलं की सुंदरी या महिलेची तिच्या पतीने तलवारीने हत्या केल्याचे समजले आणि ते हादरलेच. हत्येनंतरही आरोपी पती तिथेच हातात तलवार घेऊन ती फिरवत उभा होता.
आरोपी झाला फरार
शेजाऱ्यांनी लगेचच त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि त्याला पकडलं. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत आरोपी तेथून फरार झाला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली तलवारही ताब्यात घेतली. सकाळी उठल्यावर चहा मिळायला उशीर झाला आणि त्याच संतापच्या भरात आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितलं.
तीन मुलं झाली पोरकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी सकाळी साडेपचच्या सुमारास उठला आणि त्याने पत्नीकडे सुंदरीकडे चहा मागितला. पण चहा करायला सुंदरीला थोडा वेळ लागला. याच मुद्यावरून त्या दोघांमध्ये पहिले वाद झाला. मात्र बघता बघता तो वाद इतका पेटला की आरोपी प्रचंड संतापला. त्याने घरातच असलेली वडिलोपार्जित तलावर काढली आणि पत्नीच्या अंगावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुंदरीचा जागीच मृत्यू झाला आणि तिची तिन्ही मुलं क्षणात पोरकी झाली. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
