मंडपाऐवजी नवरा मुलगा डायरेक्ट रुग्णालयात झाला दाखल, नेमकं काय झालं ?
बिहारमधील एका लग्नात मिरवणुकीत नाचताना विनयभंगाची अप्रिय घटना घडली. त्यावरून झालेल्या वादात नवऱ्या मुलालाच लक्ष्य करण्यात आले.

Bihar Crime : बिहारमधील आराह जिल्ह्यातील भोजपूर येथे एका लग्नाच्या मिरवणुकीत अप्रिय घटना घडली. यावेळी झालेल्या वादात नवरामुलगा जखमी झाला आणि तो लग्न मंडपाऐवजी थेट रुग्णालयात जाऊन पोहोचला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. वऱ्हाडाच्या मिरवणुकीत वादाची सुरुवात झाली. मिरवणुकीत काही मुलीही नाचत होत्या, त्याचवेळी गावातील काही बदमाशांनी मिरवणुकीत मुलींचा विनयभंग सुरू केला. त्यावेळी इतर वऱ्हाडींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बदमाशांनी ते मान्य केले नाही आणि वराला रथातून उतरवून बेदम मारहाण केली, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध अवस्थेत वराला रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उदवंतनगरच्या खालिसा गावातील रहिवासी रणधीर पासवान यांचा २१ वर्षीय मुलगा अमन कुमार पासवान याचे लग्न जोगाता गावातील सत्येंद्र पासवान यांची मुलगी गुडिया हिच्याशी ठरले होते. लग्नाला जाताना मिरवणुकीत मुली नाचत असताना गावातील काही लोकांनी मिरवणुकीत नाचणाऱ्या मुलींचा विनयभंग सुरू केला. मिरवणुकीत उपस्थित लोकांनी त्यांचा निषेध केला. मात्र बदमाश तरूणांना ते बिलकूल पटले नाही. वरानेही त्यांना विरोध केला असता बदमाशांनी वराला रथातून उतरवून हाणामारी सुरू केली आणि वर बेशुद्ध झाला. प्रकरण तापत असल्याचे पाहून ते बदमाश तरूण तेथून पळून गेले.
नातेवाईकांनी वराला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वधूच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घाईघाईने आरा सदर हॉस्पिटल गाठले. त्यांना वराच्या कुटुंबीयांना लग्नाच्या मिरवणूक घेऊन येण्याचा आग्रह केला. वराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत वराच्या कुटुंबीयांनी मिरवणूक काढण्यास नकार दिला. दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू होता, पण वराच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी वराच्या कुटुंबीयांची समजूत घातली आणि लग्नाची मिरवणूक वधूच्या घरी नेण्यास सांगितले तसेच लग्नानंतर गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.
