तीन तलाक प्रकरणात फक्त पतीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, नातेवाईकांवर नाही, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

बीड येथील विवाहितेने तिचा पती, सासू आणि विवाहीत नणंद यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार, तिचे लग्न 29 सप्टेंबर 2016 रोजी मोमीन अब्दुल कलीम यांच्यासोबत मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले होते.

तीन तलाक प्रकरणात फक्त पतीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, नातेवाईकांवर नाही, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
प्रातिनिधीक फोटो

औरंगाबाद : मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 अन्वये तलाक या शब्दाचा तोंडी, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही स्वरुपात उच्चार करुन घटस्फोट देण्याच्या प्रकरणात फक्त पतीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्या नातेवाईकांविरुद्ध नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. सुनावणीअंती न्यायमूर्ती सुनील पी. देशमुख आणि न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने सासू आणि नणंद यांनी गुन्हा रद्द करण्याची केलेली विनंती मंजूर केली. अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी सासू आणि नणंदेच्यावतीने जोरदार युक्तीवाद केला.

नेमकं प्रकरण काय?

बीड येथील विवाहितेने तिचा पती, सासू आणि विवाहीत नणंद यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार, तिचे लग्न 29 सप्टेंबर 2016 रोजी मोमीन अब्दुल कलीम यांच्यासोबत मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. त्यानंतर पती, सासू आणि नणंदेने जनरल स्टोअर्समध्ये सामान आणण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपये आणण्यासाठी त्रास दिला. मागणी पूर्ण न केल्याने सासू आणि नणंदेने पतीला तलाक देण्यासाठी चिथावणी दिली.

पती मोमीन अब्दुल कलीम याने 1 सप्टेंबर 2019 रोजी तीन वेळेस ‘तलाक’ असे म्हणून तक्रारकर्तीला घटस्फोट दिला होता. प्रकरणात पती, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध कलम भादंवि तसेच मुस्लिम महिला कायदा 2019 नुसार बीड येथील पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दोषारोपपत्र ही दाखल करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. एम. एम. नेरलीकर यांनी काम पाहिले.

काय आहे निकाल ?

सासू फरीदा बेगम आणि नणंद तबस्सुम मोमीन यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता. मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 अन्वये केवळ तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. पतीच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करात येणार नाही. आरोपींविरुद्ध केलेले आरोप संदिग्ध आणि अस्पष्ट आहेत, असा निर्णय हायकोर्टाने दिला.

देशातील पहिला गुन्हा ठाण्यात

तिहेरी तलाक कायदा संमत झाल्यानंतर 2019 मध्ये देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला होता. पतीने व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली होती. ठाण्यातील कौसा मुंब्रा भागात राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 35 वर्षीय पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा :

VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं… आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं

लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गरोदर, नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकरली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI